इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर संयुक्त कारवाई करत युद्धाला तोंड फोडलं आहे. इराणकडून युएईमध्ये अनेक भागांत मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत, तसंच ड्रोन हल्लेही सुरु आहेत. त्यामुळे लोकांचं जगणं कठीण झालं आहे. युद्ध कधी थांबणार? हा प्रश्न सगळ्या जगाच्या समोर आहे. अशातच आता भारतातले संयुक्त अरब अमीरातचे पहिले राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत एक मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले हुसैन हसन मिर्झा?
संयुक्त अरब अमीरातचे राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी गल्फ देशांच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. “इराण आमचा शेजारी देश आहे. पण संयुक्त अरब अमीरात (UAE) कडे इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षात पडण्याचं काहीही कारण नाही. UAE चे दोन्ही देशांशी संबंध आहेत. अब्राहम कराराच्या अनुषंगाने आमची इस्रायलशी भागिदारीही आहे. युएई सरकारने हे आधीच स्पष्ट केलं आहे की आमच्या जमिनीचा उपयोग कुठल्याही देशाच्या विरोधात शत्रुता दाखवण्यासाठी केला जाणार नाही. या युद्धाचा भाग होण्यापेक्षा संवाद साधण्यावर आमचा भर आहे. त्यात दोन्ही देशांना रस असेल तर आम्ही संवाद साधण्यास तयार आहोत.”
युएईवर होणारे हल्ले चिंतेची बाब-हुसैन हसन
हुसैन हसन पुढे म्हणाले, युएईवर मिसाईल हल्ले केले गेले, ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्या सुरक्षा प्रणाली हे हल्ले रोखण्यात यशस्वी झाल्या आहेत. युएईने स्पष्ट केलं आहे की आमच्यावर हल्ला केला गेला तर आत्मरक्षणासाठी आम्हाला जी पावलं उचलायची आहेत ती आम्ही उचलू. आमचे सगळ्याच देशांशी चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताशी आमची भागिदारी आहे, चीन आणि इतर देशांशीही आमचे चांगले संबंध आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. युएईचे राजदूत हुसैन हसन म्हणाले की जो संघर्ष सुरु झाला आहे त्याचा परिणाम जगावर होतो आहे. वीमा कंपन्या जहाजांचा विमा करण्यास नकार देत आहेत. समुद्रात चालणारा व्यापार बाधित होतो आहे. संघर्ष असाच सुरु राहिला येत्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं आहे असंही हुसैन हसन म्हणाले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक कॉल आणि तणाव कमी होऊ शकतो
हुसैन हसन म्हणाले संयुक्त अरब अमीरात आणि भारत यांच्यात चांगले संबंध आहेत. संयुक्त अरब अमीरातमध्ये लाखो भारतीय राहतात. आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की ते आमच्या देशात सुरक्षित आहेत. मला हा पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर एक फोन केला आणि इस्रायल तसंच इराणच्या नेत्यांशी चर्चा केली तर संघर्ष निवळण्यास मदत होऊ शकते. इराण आणि इस्रायल यांच्यात जो संघर्ष निर्माण झाला आहे त्यानंतर आता पहिल्यांदाच युएईच्या भारतातील राजदुतांनी पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांशी चर्चा करावी आणि मार्ग काढण्यास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
