लासलगाव घाऊक बाजारपेठेत चालू आर्थिक वर्षांत कांद्याचे दर ७६ टक्क्यांहून अधिक घसरले असून ते प्रतिकिलो ९.५० रुपये इतके झाले आहेत. सप्टेंबर महिन्यांत प्रतिकिलो ४१.३० रुपये इतका दर होता.
नाशिकस्थित ‘एनएचआरडीएफ’नुसार कांदा घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. खरिपाचे पीक आल्याने पुरवठय़ात वाढ झाली असून त्यामुळे दर घसरत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षी दर सर्वात कमी असून त्यामध्ये आणखी एक ते दोन रुपये प्रतिकिलो घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने गेल्या ऑगस्ट महिन्यात राजधानीत कांद्याचे भाव ८० रुपये प्रतिकिलो होते. मात्र दर स्थिर ठेवण्यासाठी यंदा सरकारने कांद्याची आयातही केली होती.