केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहारांचा आग्रह धरला जात असताना ग्राहकांना मात्र गॅस सिलेंडरचे बुकिंग करताना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडरचे बुकिंग करणे महाग पडते आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ५ रुपयांची सलवत देण्यात आली आहे. मात्र बँकिंग शुल्काच्या नावाखाली ग्राहकांना ८ रुपये भरावे लागत आहेत. त्यामुळे कॅशलेस व्यवहार करणाऱ्या लोकांच्या खिशाला कात्री लागते आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौमध्ये जवळपास ५० हजार लोक घरगुती वापरासाठी आवश्यक गॅस सिलेंडरचे ऑनलाइन बुकिंग करतात. गोमती नगरमधील देवी प्रसाद यांनी पाच रुपयांची सवलत मिळत असल्याने काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग केले. काही दिवसानंतर बँक खात्यातील व्यवहारांचा तपशील तपासताना त्यांना त्यांच्या खात्यातून बँकिंग शुल्क म्हणून ८ रुपये आकारले आल्याचे लक्षात आले. असाच प्रकार चिनहटमध्ये राहणाऱ्या अशोक यांच्यासोबतही झाला.

कॅशलेस होऊ पाहणाऱ्या अनेक देशभरातील अनेक भागांमधील लोकांना ऑनलाईन व्यवहार करताना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. कॅशलेस व्यवहार फायद्याचे असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले, तरी यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटकाच बसताना दिसतो आहे. ग्राहकांकडून बँकिंग शुल्काच्या स्वरुपात आठ रुपये आकारले जात असल्याची कबुली इंडियन ऑईलचे अधिकारी ए. के. वर्मा यांनी दिली आहे. ‘बँकिंग शुल्काच्या नावाखाली आठ रुपये आकारले जात असल्याची माहिती खरी आहे. याविषयी पेट्रोलियम मंत्रालयाच्या स्तरावर बातचीत सुरू आहे. त्यामुळे लवकरच बँकिंग शुल्कातून ग्राहकांची सुटका होईल,’ असे वर्मा यांनी म्हटले आहे.