करोनाचा उद्रेक झाल्यापासून शाळा-महाविद्यालये आणि कार्यालये बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. तसेच घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिस मीटिंग देखील ऑनलाइन होत आहेत. ऑनलाइन मीटिंगसाठी सर्वाधिक वापर झूमचा केला जातोय. मात्र, आज झूम डाऊन झाले असून अनेक य़ुजर्सना कनेक्ट करताना अडचणी येत आहेत. झूम सध्या मोठ्या प्रमाणावर आउटेजचा सामना करत आहे. याचा जगातील अनेक भागांमध्ये व्हिडिओ कॉल, वेबिनार आणि ऑनलाइन शिक्षणावर परिणाम होत आहे. तर, या आउटेजचा सर्वात जास्त फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झूम डाऊन झाल्याने व्हिडिओ टेलीकॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाऊनडिटेक्टर या इंटरनेटवरील आऊटजेसचा ट्रॅक ठेवणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार आज पहाटे ५ वाजतापासून झूम कनेक्ट होण्यास अडचणी येऊ लागल्या. जवळजवळ १५० जणांनी तक्रारी नोंदवल्या, अशी माहिती न्यूज डॉट कॉम या वेबसाइटने दिली. झूमकडून ऑस्ट्रेलियातील लोकांचे आऊटेज दुरुस्त करणे सुरू केले आहेत, मात्र अजूनही अनेक युजर्सला झूम कॉलशी कनेक्ट करण्यात समस्या येत आहेत.

“लाइव्ह मीटिंगमध्ये सहभागी होताना युजरला येणाऱ्या अडचणींची आम्हाला जाणीव आहे. त्यासंदर्भात आम्ही सध्या तपास करत आहोत आणि लवकरच नवीन अपडेट युजर्सना उपलब्ध करून देऊ. युजर्सला आलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत,” असे झूमने ट्विटरवर म्हटले आहे. दरम्यान, आउटेज कशामुळे झाले याबद्दल झूमकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

भारतातही मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू मधील सर्वात जास्त युजर्सनी झूम वापरण्यात अडचणी येत असल्याचं डाऊनडिटेक्टरच्या आकडेवारीवरून समोर आलंय. चांगले इंटरनेट कनेक्शन असूनही युजर व्हिडिओ मीटिंगशी कनेक्ट होऊ शकत नाहीयेत. काही युजर्सना स्क्रीनवर “waiting for the host to start the meeting” असा मेसेज येत असल्याचं म्हटलंय. कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांनी त्यांच्या मींटिगच्या वेळा बदलल्या आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online classes video meetings affected as zoom is down globally hrc
First published on: 23-08-2021 at 16:19 IST