ऑनलाईन फूड डिलीव्हरी अ‍ॅप्सवरुन जेवण मागवणं येत्या काही दिवसांमध्ये महाग होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात येणार आहे. समितीतल्या सदस्यांनी फूड डिलीव्हरी अ‍ॅप्सना जीएसटीच्या अंतर्गत आणण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ऑनलाईन जेवण मागवणं महाग होणार आहे.

शुक्रवारी जीएसटी परिषदेची बैठक लखनौ इथं होणार आहे. सध्या जी व्यवस्था आहे, त्यामुळे सरकारला कराच्या बाबतीत दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचं सांगितलं जात आहे. जीएसटी परिषदेच्या समितीने सांगितलं की फूड डिलीव्हरी अ‍ॅप्सनाही ई-कॉमर्स क्षेत्रात समाविष्ट करायला हवं.

वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबतच सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचाही समावेश आहे. ही परिषद शुक्रवारी लखनौ इथं होणार आहे. या आधीची बैठक १२ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली होती.

या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल यांचाही अंतर्भाव जीएसटीमध्ये करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच करोना महामारीशी संबंधित साहित्याच्या किमतींबद्दलही चर्चा होणार आहे.