पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी व माजी दिवंगत नेते कामराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करणारे माजी मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कारती चिदंबरम यांनी त्यांच्यावर बजावण्यात आलेल्या शिस्तभंग समितीच्या नोटिशीला उत्तर देण्यास नकार दिला.
तामिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष इव्हीकेएस एलंगोवन यांना अशी नोटीस काढण्याचा काहीही अधिकार नाही. केवळ अ.भा. काँग्रेस समितीच आपल्याला जाब विचारू शकते असा युक्तिवाद करून त्यांनी नोटिशीला उत्तर देण्याचे नाकारले.
२३ जानेवारीला त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांनी पक्षश्रेष्ठी व कामराज यांच्या विरोधात विधाने केली होती. त्यांच्या समर्थक गटाला जी ६७ म्हणतात, तामिळनाडूत १९६७ म्हणजे काँग्रेस हरल्यानंतर जन्मलेले काँग्रेस नेते त्यात आहेत.
कारती चिदंबरम यांनी २२ जानेवारीला एका सभेत भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय ज्ञानाची स्तुती केली होती. प्रदेशाध्यक्ष एलंगोवन यांनी नोटिशीत असे म्हटले होते की, कारती यांनी पक्षश्रेष्ठींवर टीका करून काँग्रेसच्या प्रगतीत अडथळा आणला आहे. कारती यांनी उत्तर दिले नाही तर त्यांना पक्षातून काढले जाईल असे त्यांनी म्हटले होते.
नोटिशीवर कारती यांनी असे म्हटले होते की, आपण अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य असून अ. भा. काँग्रेस समितीच आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकते. आपण अ. भा. काँग्रेस समितीला स्पष्टीकरण देऊ.