Pakistani Leader To PM Modi: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हातात पाकिस्तानची सत्ता एकवटली आहे. फिल्ड मार्शलची जागा मिळाल्यानंतर आता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संविधानात दुरूस्ती करून असीम मुनीर यांच्या हातात अण्वस्त्रांचे संपूर्ण नियंत्रण दिले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच नाही तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

याच विषयासंदर्भात पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील प्रमुख नेते आणि सिंधु मुत्ताहिदा महज (JSMM) या संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले असून त्यात पाकिस्तानच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरातून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्यात आले आहे. तसेच शफी बुरफत यांनी याचा मजकूर त्यांच्या एक्स हँडलवरही शेअर केला आहे.

पाकिस्तान सध्या गंभीर आणि अस्थिर परिस्थितीतून जात आहे. धार्मिक कट्टरपंथी आणि सेनेच्या नियंत्रणात देश गेल्यामुळे आगामी काळात मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे, अशी भीती बुरफत यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली.

बुरफत यांनी पत्रात काय लिहिले?

बुरफत यांनी पत्रात लिहिले की, असीम मुनीर यांच्याकडे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण देऊन त्यांना अणुबॉम्बची मालकी देण्यात आली आहे. यामुळे केवळ सिंधच नवे तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानची विद्यमान सैन्याची रचना शेजारी देश आणि वैश्विक शांतीसाठी गंभीर आव्हान बनले आहे.

‘तुमचे नेतृत्व लाखांचे जीव वाचवू शकते’

या पत्रात बुरफत यांनी पंतप्रधान मोदींकडे मानवतेच्या नात्याने आवाहन केले आहे. ते म्हणाले, हे केवळ एक राजकीय विधान नाही. तर एक इशारा आहे. सिंधू ही एक प्राचीन संस्कृती आणि स्वातंत्र्य प्रिय असलेला प्रांत आहे. पाकिस्तानच्या लष्करी-इस्लामिक राजवटीमुळे सिंध प्रांताचे दमन होत आहे. पण तुमचे नेतृत्व लाखो निरपराध लोकांचे आयुष्य वाचवू शकते.

‘तुम्हीच आम्हाला वाचवू शकता’

शफी बुरफत पुढे म्हणाले, “पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि बेजबाबदार अण्वस्त्र वर्तनामुळे संपूर्ण जगाच्या शांततेवर गंडांतर येऊ शकते. जोपर्यंत याचा बिमोड केला जात नाही, तोपर्यंत जगात शांतता नांदणार नाही. भारत न्याय आणि सभ्यतेची भूमी आहे. आम्हाला विश्वास आहे की, वंचित आणि दबल्या गेलेल्यांबरोबर भारत उभा राहिल. आम्ही अस्तित्त्वाची लढाई लढत आहोत. यातून तुम्हीच आम्हाला वाचवू शकता.”