केरळ : सौरऊर्जा घोटाळा अहवाल सादर

केरळमधील गाजलेल्या सौरऊर्जा घोटाळ्याच्या न्यायिक चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री पी. विजयन यांनी गुरुवारी विधानसभेत जोरदार गदारोळांत सादर केला. जनतेची फसवणूक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री ओम्मन चंडी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या घोटाळ्यातील आरोपी सरिता नायर आणि तिच्या कंपनीला सर्वतोपरी सहकार्य केल्याचे आढळले आहे, असे विजयन म्हणाले.

न्या. जी. शिवराजन यांचा चार खंडांचा अहवाल आणि त्याबाबत सरकारने केलेली कृती यांचा मसुदा विजयन यांनी केरळ विधानसभेच्या विशेष सत्रांत सभागृहांत सादर केला. न्यायिक आयोगाचा अहवास सादर करण्यासाठी केरळ विधानसभेचे प्रथम अधिवेशन बोलाविण्यात आले आहे.

ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी ओम्मन चंडी आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांनी आरोपी सरिता नायर आणि तिच्या कंपनीला सर्वतोपरी सहकार्य केले, असे या अहवालाचा तपशील सादर करताना विजयन म्हणाले. सरिता यांनी जे आरोप केले आहेत त्यांची चौकशी करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली असल्याचे विजयन म्हणाले.

विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांना लाच देण्यात आली असल्याबरोबरच त्यांनी आरोपीकडून शरीरसुख घेतल्याचेही अहवालात म्हटले आहे. भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांविरोधात सरकार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचे विजयन यांनी स्पष्ट केले.

आयोगाच्या अहवालात असलेल्या विविध विषयांच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.