लंडन : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलवाहतूक ठप्प आहे. असे असतानाही ‘ओपेक प्लस’ या प्रमुख तेल उत्पादक देशांच्या गटाने रविवारी खनिज तेलाच्या उत्पादनात सलग चौथ्यांदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जुलै महिन्यापासून दररोज १ लाख ८८ हजार बॅरल्स अतिरिक्त तेल उत्पादन करण्यात येणार आहे. असे असले तरीही या वाढीचा परिणाम बाजारात तात्काळ दिसण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिका-इराण युद्धामुळे फेब्रुवारीच्या अखेरीपासून सौदी अरेबियासारख्या प्रमुख देशांना ग्राहकांना पूर्ण क्षमतेने तेलपुरवठा करता आलेला नाही. यामुळे जगात तेल पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. सध्या ‘ओपेक प्लस’मधील रशिया, सौदी अरेबिया, इराक, कुवेत, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ओमान हे देश उत्पादन वाढीचा निर्णय घेत आहेत. या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाल्यास स्थिती झपाट्याने बदलेल, असा अंदाज आहे.