Operation Sindoor Ajit Doval PM Modi: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पहलगाम येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताचे हे ऑपरेशन यशस्वी करण्यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्वाची चर्चा झाली होती. पाकिस्तानच्या अणुयुद्धाच्या धमक्यांना भीक न घालता भारताने ऑपरेशन कशापद्धतीने यशस्वी केले? याची माहिती आता समोर आली आहे.
वॉररुममध्ये डोवाल-मोदींमध्ये काय चर्चा झाली?
भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरचे नियोजन केले त्यावेळी वॉररुममध्ये पाकिस्तानचा संभाव्य अण्वस्त्र वापर ही चर्चा केंद्रस्थानी होती. पाकिस्तान अणुयुद्ध किंवा अण्वस्त्र वापराची धमकी केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी देत असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काढला होता. भारताच्या दहशतवादविरोधात कारवाईला रोखण्यासाठी पाकिस्तान या धमकीचा ढाल म्हणून वापर करत असल्याचे डोवाल यांचे मत होते. यानंतर भारताने प्रत्यक्ष हल्ला करण्याच्या केवळ सहा तासांपूर्वी लक्ष्य निश्चित केली. ज्या ठिकाणांना लक्ष्य करायचंय ती निश्चित करण्यात आली, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने न्यूज१८ ने प्रसिद्ध केले आहे.
अण्वस्त्र वापराबाबत डोवाल काय म्हणाले?
एखाद्या क्षेत्राचे किंवा भूभागाचे भवितव्य सुरक्षित ठेण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करणे अपेक्षित असते. बंडखोर किंवा दहशतवादी संघटना जसे की लष्कर ए तौयबा किंवा जैश-ए- मोहम्मद यासारख्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी नाही, असे अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यावेळी चर्चेत सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना पटवून दिले. डोवाल यांच्या विश्लेषणानुसार पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करण्याची शक्यता कमी आहे. बहावलपूर आणि मुरिदके येथील दहशतवादी तळांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान भारताकडून मिळणाऱ्या जबरदस्त प्रत्युत्तराचा सामना करण्याचे धाडस करणार नाही, असेही डोवाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
दहशतवादाचा बिमोड करण्याचा डोवाल यांचा सल्ला
पाकिस्तानने दहशतवादी संघटनांच्या सुरक्षेचा प्रयत्न केल्यास भारताच्या प्रत्युत्तराचा सामना त्यांना करावा लागेल, पाकिस्तानमध्ये मोठा विध्वंसही होऊ शकतो, असे डोवाल यांनी स्पष्ट केले. सीमा ओलांडून दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्याची गरज देखील डोवाल यांनी व्यक्त केली. भारताने असे न केल्यास पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने या दहशतवादी संघटना हल्ले करतच राहतील असेही डोवाल म्हणाले. पंतप्रधान मोदींनी देखील डोवाल यांना पूर्ण समर्थन दिल्याचे न्यूज१८ च्या वृत्तात म्हटले आहे. दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यासह अण्वस्त्र युद्धासारखी स्थिती निर्माण होऊ द्यायची नाही असेही या बैठकीत ठरले होते.
२३ मिनिटांत पूर्ण केले ऑपरेशन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष हल्ला करण्याच्या सहा तासांपूर्वी भारताने लक्ष्य निश्चित केली होती. हल्ल्यासाठी भारताने लष्करी सुविधांचा वापर केला, ब्राम्होस क्षेपणास्त्र, उपग्रह आणि इंटिग्रेटेड एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टिम यांचा वापर भारताने केला. यामुळे भारताने निश्चित केलेल्या लक्ष्यांचा ठरलेल्या वेळेत अचूक वेध घेता आला. भारताने नऊ लष्करी तळांचा २३ मिनिटांमध्ये अचूक वेध घेतला. भारताने हे ऑपरेशन १०० टक्के यशस्वी केल्याचे सूत्रांचे मत आहे.
