Operation Sindoor Anniversary India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण होत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ऑस्ट्रियन हवाई युद्ध विश्लेषक आणि इतिहासकार टॉम कूपर यांनी भारताच्या लष्करी कारवाईचे कौतुक केले. या कारवाईत भारताने पाकिस्तानवर स्पष्ट लष्करी विजय मिळवला असे, मत कूपर यांनी मांडले. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये २५ पर्यटक आणि स्थानिकांचा मृत्यू झाला होता.
भारताचे हल्ले यशस्वी
टॉम कूपर यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या लष्करी क्षमतांचे कौतुक केले. “भारताने पाकिस्तानमधील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoJK) दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि यशस्वी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आणि त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला”, असे कूपर म्हणाले. गेल्यावर्षी (२०२५) ७ मे रोजी भारताने पाकिस्तानवर पहाटेच्या सुमारास हल्ला करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते.
पाकिस्तानला स्पष्ट संदेश
“भारत पाकिस्तानमधील कोणतेही लक्ष्य अचूक टार्गेट करू शकतो आणि पाकिस्तान ते रोखण्यास असमर्थ आहे. भारत स्पर्शही करु शकत नाही असा आत्मविश्वास असलेल्या ठिकाणांवर देखील भारताने अचूक निशाणा साधला, त्यामुळे या कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला”, असे कूपर म्हणाले. “पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल अमृतसरसह विविध लष्करी आणि नागरी भागांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ९५ ते ९८ टक्के पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करुन हल्ले परतवून लावले”, असे कूपर म्हणाले.
भविष्यातही संघर्षाची शक्यता
भारताने पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणा आणि मुख्य तळांना लक्ष्य करून त्यांना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. पाकिस्तान लष्करी आधुनिकीकरणासाठी चीनच्या J-10 लढाऊ विमाने आणि PL-15 क्षेपणास्त्रांवर अवलंबून आहे, परंतु हे उपाय तात्पुरते आहेत, असे मत कूपर यांनी मांडले. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला अशी युद्ध परवडणारी नाहीत असे कूपर यांनी नमूद केले. दरम्यान, भविष्यातही भारत – पाकिस्तान यांच्यात संघर्ष पाहायला मिळू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
