Operation Sindoor Video: पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहिमेचे व्हिडीओ आता भारतीय लष्कराच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आले आहेत. बुधवारी पहाटे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांच्या इमारती उध्वस्त झाल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली.
हवाई दलाकडून पहाटे १.०४ वाजता पहिला एअर स्ट्राईक करण्यात आला. यात पहिला स्ट्राईक पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील कोटली येथील मरकज अब्बास या दहशतवाद्यांच्या तळावर करण्यात आला. लष्कर-ए-तैयबाच्या आत्मघातकी बॉम्बर्सना प्रशिक्षण देण्याचे काम या तळावर केले जात होते. याठिकाणी ५० हून अधिक दहशतवादी प्रशिक्षणासाठी जमले होते, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
कोटली येथील गुलपूर तळाला लक्ष्य करण्यात आल्याचा दुसरा व्हिडीओ सैन्यातर्फे शेअर करण्यात आला आहे. पहाटे १.०८ मिनिटांनी हा स्ट्राईक झाला. नियंत्रण रेषेपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या या तळालाही हवाई दलाने उध्वस्त केले आहे. एप्रिल २०२३ मध्ये पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांचा मृत्यू झाला होता. जून २०२४ मध्ये यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना गुलपूर कॅम्पमध्ये प्रशिक्षण दिले गेले होते.
तसेच आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ किमी अंतरावर असलेल्या सियालकोट येथील मेहमुना जोया दहशतवादी तळावर तिसरा स्ट्राईक करण्यात आला. पहाटे १.११ मिनिटांनी हा स्ट्राईक झाला. या कॅम्पमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे लष्कराने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे दहशत पसरविण्यासाठी या केंद्राचा वापर होत असल्याचेही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले.
ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर तब्बल १० तासांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत पत्रकार परिषद घेत या मोहिमेची माहिती जगाला देण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह या मोहिमेची माहिती दिली.