Operation Sindoor Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यांतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले करत ते उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी ताकदीची झलक पाहायला मिळाली.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरचे जोरदार समर्थन करताना, एका अमेरिकन युद्ध तज्ञाने म्हटले आहे की, पाकिस्तान विरोधात भारताने आक्रमक आणि बचावात्मक या दोन्हींमध्ये वर्चस्व गाजवले. यातून असे दिसते की, भारताकडे “पाकिस्तानात कुठेही, कधीही” हल्ला करण्याची क्षमता आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, कर्नल (निवृत्त) जॉन स्पेन्सर म्हणाले की, “पाकिस्तानने वापरलेल्या चिनी हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांशी जुळवून घेऊ शकत नाहीत, ज्यांचा वापर युद्धादरम्यान लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी केला जात असे. भारताने पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यात व पाकिस्तानी ड्रोन हल्ले आणि हायस्पीड क्षेपणास्त्रांपासून स्वतःचा बचाव करण्यात यश मिळवले आहे.”
पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली
“ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. भारताचा राजकीय आणि लष्करी संदेश स्पष्ट होता, “आम्हाला युद्ध नको आहे, परंतु कोणी दहशतवाद केला तर त्याल शिक्षाही देऊ,” असे माजी अमेरिकन लष्करी अधिकारी स्पेन्सर यांनी पुढे सांगितले.
भारताच्या प्रगत लष्करी क्षमतेचा पुरावा
मॉडर्न वॉर इन्स्टिट्यूटमध्ये शहरी युद्ध अभ्यासाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे स्पेन्सर यांनी यावर भर दिला की, पाकिस्तान वापरत असलेल्या चिनी हवाई संरक्षण यंत्रणेला निष्प्रभ करण्याची ब्राह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता ही भारताच्या प्रगत लष्करी क्षमतेचा पुरावा आहे.
“चीनी हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्रे भारताच्या प्रणालींच्या तुलनेत कमी दर्जाची आहेत. भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र चीनी आणि पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींना भेदण्यात सक्षम होते. यातून भारताचा संदेश स्पष्ट होता की, ते पाकिस्तानात कधीही आणि कुठेही मारा करू शकतात,” असे स्पेन्सर म्हणाले.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर
पाकिस्तानने भारतीय लष्करी सुविधांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा मारा सुरू केल्यानंतर भारताने १० मे रोजी पाकिस्तानमधील ११ हवाई तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांसाठी, भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर केला होता.
याशिवाय, जेव्हा भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या चिनी हवाई संरक्षण प्रणालींना यशस्वीरित्या भेदत पाकिस्तानात खोलवर घसून दहशतवादी तळांवर हल्ले केले.