Operation Sindoor पहलगाम इथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ६ मेच्या रात्री पाकिस्तानच्या पीओजेकेवरील ९ दहशतवादी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि त्याचं कारणही तसंच होतं. पहलगाममधील या हल्ल्यात पुरूषांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांच्यासोबत असलेल्या अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले. या महिलांचा आक्रोश संपूर्ण जगाने पाहिला होता. याच कारणाने या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनबाबत माहिती दिली. एक होत्या सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग. सोफिया यांच्या आईने, वडिलांनी आणि भावाने आनंद व्यक्त केला आहे.

सोफिया कुरेशी यांची आई हलिमा यांनी काय सांगितलं?

माझ्या मुलीने आपल्या देशासाठी, हिंदुस्थानासाठी जे केलं आहे त्याचा मला खूप आनंद आहे. याचप्रकारे तिने पुढे जावं, तसंच इतरांनी आपल्या मुलींना शिकवावं, समृद्ध करावं. त्यांना चांगलं शिक्षण द्या जेणेकरुन त्या माझ्या मुलीप्रमाणे सैन्य दलात अधिकारी होतील आणि देशासाठी काहीतरी करु शकतील. प्रत्येक घरातली एक मुलगी आणि एक मुलगा सैन्यात गेला पाहिजे असं मला वाटतं. सोफिया जेव्हा लहान होती तेव्हा तिची आजी तिला गोष्टी सांगायची. तुझे आजोबा लष्करात आहेत त्यांचे किस्से आजी सोफियाला सांगत असे. सोफिया आणि तिची बहीण खेळण्यातली बंदुकही खेळायाची. ती मोठी झाली, तिचं शिक्षण झाल्यावर तिने सांगितलं की मला लष्करात जायचं आहे आम्ही तिला जा म्हटलं. एअर स्ट्राईकच्या आधी सोफिया फक्त इतकंच म्हणाली होती आमच्यासाठी दुवा कर. काय होणार आहे ते आम्हालाही माहीत नव्हतं. दोन दिवसांपूर्वी ती इतकंच म्हणाली होती की आमच्यासाठी दुवा कर बस इतकंच बोलणं झालं. पुढे काय होणार? ते आम्हालाही माहीत नव्हतं. असं सोफिया कुरेशी यांची आई हलिमा कुरेशी यांनी सांगितलं.

सोफिया कुरेशींच्या भावाने आणि वडिलांनी काय सांगितलं?

सोफिया कुरेशींचा भाऊ म्हणाला, आज मी टीव्ही बघत होतो आणि मला आश्चर्यचा धक्का बसला मी म्हटलं अरे ही तर माझी बहीण सोफिया आहे. तिने पाकिस्तानला कसा धडा शिकवला ते ऐकलं तेव्हा वाटलं की आता हिशोब बरोबर झाला आणि गर्वाने आमचीही छाती फुलून आली. देशासाठी प्राण पणाला लावण्याचाक्षण हा कुठल्याही सैनिकासाठी मोलाचाच असतो. त्यापेक्षा कुठला मोलाचा क्षण त्याच्या आयुष्यात नसतो. माझ्या मुलीने आपल्या देशासाठी जे केलं ते पाहून अभिमानाने छाती फुलून आली. मला खूप अभिमान आहे माझ्या मुलीचा असं सोफिया यांच्या वडिलांनी सांगितलं.

Operation Sindoor News
ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. (फोटो- ANI)

कोण आहेत सोफिया कुरेशी?

कर्तबगार अधिकारी अशी कर्नल सोफिया कुरेशी यांची ओळख आहे. सोफिया यांचं लहानपणापासूनच वायुसेनेत दाखल होण्याचं स्वप्न होतं. त्या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. बायो-केमिस्ट्री या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. १९९९ मध्ये चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून सोफिया यांची भारतीय लष्करात प्रवेश केला. सर्वात उल्लेखनीय म्हणजे बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स-१८ मध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. पुण्यात झालेल्या फील्ड ट्रेनिंग सरावात सहभागी झालेल्या १७ देशांमधील तुकड्यांमध्ये त्या एकमेव महिला प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी ४० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. सोफिया कुरेशी यांनी २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे. सोफिया यांचे आजोबा सैन्यात होते आणि त्यांचे पतीदेखील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमधील लष्करी अधिकारी आहेत.