Operation Sindoor : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. भारताने तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष निर्माण झाला होता. पण त्यानंतर अखेर दोन्ही देशांत युद्धविराम जाहीर करण्यात आला होता.
या सर्व घडामोडींवर आता तब्बल एका वर्षांनी भारताच्या माजी संरक्षण प्रमुखांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली होती, तेव्हा भारताने पाकिस्तानला प्रतीक्षा करायला लावली होती, असा खुलासा जनरल अनिल चौहान यांनी केला आहे.
अनिल चौहान यांच्या मते, १० मे २०२५ रोजी सकाळी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानने डीजीएमओ हॉटलाईनच्या माध्यमातून भारताशी संपर्क साधत तत्काळ युद्धविरामाची विनंती केली होती. तेव्हा भारताने लगेच कोणताही रिप्लाय न देता पाकिस्तानला दुपारपर्यंत वाट पाहायला लावली होती. पण त्यानंतर भारताने विचारपूर्वक निर्णय घेतला, असा खुलासा निवृत्त सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं.
अनिल चौहान यांनी काय म्हटलं?
“पाकिस्तानने १० मे रोजी चर्चेसाठी भारताशी संपर्क साधला होता. खरं तर पाकिस्तानने चर्चेसाठी संपर्क साधणं हे आश्चर्यकारक होतं. कारण ९ मे रोजी पाकिस्तानकडून भारताला ४८ तासांत धडा शिकवण्याचा इशारा देण्यात येत होता. पण त्याच दरम्यान म्हणजे ९ मे रोजी रात्री ते १० मे च्या दुपारपर्यंत भारताने पाकिस्तानच्या ११ लष्करी आणि हवाई तळांवर जोरदार हल्ले केले होते. यामध्ये पाकिस्तानच्या अनेक रडार केंद्राचं आणि लढाऊ विमानांचं नुकसान झालं होतं”, अशी माहिती चौहान यांनी सांगितली.
“पाकिस्तानमधील कोणतंही लष्करी ठिकाण भारतीय सशस्त्र दलांच्या आवाक्याबाहेर नव्हतं. खरं तर रावळपिंडीतील नूर खान, रहीम यार खान आणि भोलारी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं की आजही तेथे दुरूस्तीचं काम केलं जात आहे. त्यामुळे अवघ्या ८ तासांत पाकिस्तानने भारताशी संपर्क साधत युद्धविराम करण्याची मागणी केली होती. जर तेव्हा हा संघर्ष सुरू राहिला असता तर पाकिस्तानचा मोठा पराभव झाला असता याची जाणीव पाकिस्तानलाही होती”, असंही चौहान यांनी म्हटलं आहे.
“आम्ही सकाळी ९:३० वाजता युद्धविराम स्वीकारण्याऐवजी दुपारपर्यंत लष्करी कारवाई सुरू ठेवली होती. कारण आम्हाला अधिक निर्णायक विजय हवा होता. आम्हाला रणांगणाचं चित्र अधिक स्पष्ट दिसत होतं. आमच्या हल्ल्यांचे काय परिणाम झाले याची जाणीव आम्हालाही होती”, असंही चौहान यांनी म्हटलं आहे.
