Operation Sindoor Memorial Park: जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतानं या हल्ल्याचा सूड म्हणून ७ मे रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ या सर्व घडामोडींनंतर आता भारत-पाकिस्तान सीमेजवळ याच ऑपरेशन सिंदूरच्या स्मृतीप्रीत्यर्थ गर्द झाडींचं एक उद्यान उभारलं जात आहे. या उद्यानाला ‘सिंदूर वन’ असं नाव देण्यात आलं आहे.
कुठे उभारलं जात आहे स्मृती उद्यान?
गुजरात सरकारनं हे उद्यान तयार करत असल्याचं जाहीर केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, हे उद्यान भारत-पाकिस्तान सीमेजवळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात उभारलं जाणार आहे. या ठिकाणी सीमेपलीकडून पाकिस्तानी लष्करानं हल्लेदेखील केले होते. येत्या एक ते दीड वर्षात हे स्मृतिस्थळ उद्यान तयार होणार असून उद्यानाचं काम सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
“ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय समाज, आर्मी नौदल, हवाई दल, बीएसएफ आणि इतर यंत्रणांनी दाखवलेल्या एकतेचं प्रतीक म्हणून हे स्मृतीउद्यान उभारण्याचं नियोजन वनविभागानं केलं आहे”, अशी प्रतिक्रिया कच्छचे जिल्हाधिकारी आनंद पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
कसं आहे Sindoor Van?
कच्छमधल्या ८ एकर जागेवर गर्द झाडींचं ‘वन कवच’ तयार केलं जाणार आहे. भुज-मांडवी रस्त्यावरील मिर्झापार भागात ही जमीन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ऑपरेशन सिंदूरनंतर गुजरात दौऱ्यादरम्यान याच ठिकाणी भेट दिली होती, अशी माहिती पटेल यांनी दिली. तसेच, या ठिकाणी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थदेखील एक विशिष्ट बांधकाम केलं जाणार आहे.
“सिंदूर वन हे एक थीम बेस्ड मेमोरियल पार्क असेल. इथल्या गर्द झाडीमध्ये औषधी वनस्पती, झुडपं, विविध प्रकारचे वृक्ष यांचा समावेश असेल. या झाडांमध्ये प्रामुख्याने सिंदूरची झाडे असतील”, अशी माहिती कच्छ विभागाचे मुख्य वनअधिकारी संदीप कुमार यांनी दिली. या भागात एकूण ३५ प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याचा मानस वनविभागाचा असून प्रतीहेक्टर १० हजार वृक्षांची लागवड केली जाईल. भुजबमधलं हे सर्वात दाट वन असे, असंही कुमार म्हणाले.