Operation Sindoor Donald Trump Reaction: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बुधवारी (७ मे) पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी तळांवर लष्करी हल्ले केले. भारताच्या या लष्करी कारावाईनंतर आज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर दोन्ही देशांना मध्यस्थीसाठी गरज भासली तर, त्यासाठी ते उपलब्ध असतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ती “भयानक” आहे.
“माझी भूमिका अशी आहे की, मी दोन्ही देशांशी सहमत आहे, दोन्ही देशांशी माझे चांगले संबंध आहेत आणि मला त्यांना या परिस्थितीतून मार्ग काढताना पहायचे आहे. मला त्यांच्यातील तणाव थांबलेला पहायचा आहे. मला आशा आशा आहे की, ते आता थांबतील. त्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे, म्हणून आशा आहे की ते आता थांबतील. हा तणाव दूर करण्यासाठी जर त्यांना माझी मदत लागली तर, मी त्यासाठी उपलब्ध असेन” असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.
दोन आठवड्यांपूर्वी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका परदेशी नागरिकाचाही समावेश होता. पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील शांतता बिघडली असून, भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि सिंधू पाणी करार स्थगित करणे यासह दोन आठवड्यांच्या राजनैतिक आणि गैर-लष्करी उपाययोजनांनंतर, भारताने बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशवादी तळांवर हावाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.
तत्पूर्वी, ऑपरेशन सिंदूरचे वृत्त समोर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालही यावर प्रतिक्रिया दिली होती. पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देताना ही लाजिरवाणी बाब असल्याचं नमूद करत डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काहीतरी होईल, असा अंदाज सगळ्यांनाच होता, असे म्हटले होते.
“ही एक लाजिरवाणी बाब आहे. आम्हाला आत्ताच या एअर स्ट्राईकसंदर्भात माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काहीतरी घडणार हे लोकांना माहिती होते. भारत व पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून हा संघर्ष चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की हे अनेक वर्षं नव्हे तर शतकांपासून चालू आहे. आता मी आशा करतो की हे सगळे लवकर संपावे”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.