Operation Sindoor : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या ९ दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, त्या दरम्यान, पाकिस्तानकडून पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्यात आल्याच्या चर्चांनतर भारतीय लष्कराने या वृत्ताचं मंगळवारी खंडन केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

भारतीय लष्कराने एका अधिकृत निवेदनात या संदर्भातील माहिती देताना म्हटलं की, सुवर्ण मंदिरात कोणत्याही हवाई संरक्षण तोफा तैनात करण्यात आल्या नव्हत्या असं म्हटलं आहे. तसेच सुवर्ण मंदिराचे मुख्य ग्रंथी सिंह साहिब ग्यानी रघबीर सिंह यांनी देखील मंदिर परिसरात हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करण्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

सुवर्ण मंदिराच्या मुख्य ग्रंथींनी म्हटलं की, “भारतीय सैन्याने आमच्याशी संपर्क साधल्याची मला कोणतीही माहिती नाही. मी रजेवर होतो आणि परदेशात प्रवास करत होतो. मला या प्रकरणाची सखोल चौकशी हवी आहे. यामागे सैन्याचा हेतू काय होता हे स्पष्ट झालं पाहिजे”, असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुवर्ण मंदिराच्या परिसरात हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्याची परवानगी दिल्याचा दावा करणाऱ्या बातम्या समोर आल्यानंतर आता भारतीय लष्कराने यावर स्पष्टीकरण देत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.