न्यूयॉर्क : ‘‘भारतात गुंतवणूकदार आणि उद्योजक यांना मोठी संधी आहे. जागतिक पुरवठा साखळी पुन्हा मार्गावर आली असताना आणि देशाचे नेतृत्व परदेशी गुंतवणुकीस वचनबद्ध असताना त्याचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे केले.

सीतारामन यांचे वॉशिंग्टन येथे शुक्रवारी आगमन झाले.  त्यांनी जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत भाग घेतला तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या. सीतारामन यांनी त्यांच्या समपदस्थ जॅनेट येलन यांच्याशी भारत-अमेरिका आर्थिक भागीदारी संवादाच्या निमित्ताने चर्चा केली.

सीतारामन म्हणाल्या की, आता पुरवठा साखळ्या पूर्ववत होत असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी गुंतवणुकीला महत्त्व देतात.  भारतात गुंतवणूकदार व उद्योजक यांना नेहमीच संधी आहे.

 फिक्की व भारत-अमेरिका भागीदारी मंचाच्या कार्यक्रमात शनिवारी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, भारतातील नवोद्योग मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. आता अनेक जण भांडवली बाजारातून पैसा जमवत आहेत. यावर्षी असे १६ युनिकॉर्न उद्योग उदयास आले. त्यांनी बाजारातून भांडवल उभे केले आहे. आव्हानात्मक काळातही भारताने डिजिटलायझेशन कायम ठेवले असून आर्थिक क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. अर्थतंत्रज्ञान कंपन्या महत्त्वाच्या ठरत आहेत.

सीतारामन यांनी मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मीबॅख व कार्यकारी अध्यक्ष अभय बंगा यांच्याशी चर्चा केली.

सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर, आयबीएमचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा, प्रुडेन्शियलचे कार्यकारी उपाध्यक्ष स्कॉट स्लेस्टर, लेगॅटमचे मुख्य गुंतवणूक अधिकारी फिलीप वसिलिऊ यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी बंगा यांनी सांगितले की, भारत एका नव्या वळणावर असून सुधारणांचा मार्ग अजून सुरूच आहे. त्याने गती घेतली आहे. उत्पादनाधिष्ठित लाभांसाठी आम्ही आभारी आहोत. कारण त्यातून भारतात कामगारांची जास्त संख्या लागेल असे उद्योग तयार होतील. भारत जे करीत आहे त्याबाबत आम्ही आशावादी आहोत व भारताने पुरवठा साखळ्यांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे.

फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमणियन यांनी सीतारामन यांना सांगितले की, गतीशक्ती योजना व नवोद्योगात युनिकॉर्नच्या रूपात भारताने मोठे काम केले आहे.