पीटीआय, फतेहबाद (हरियाणा) : भाजपला अंगावर घ्यायचे असेल तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधकांची संयुक्त आघाडी उभारणे ही काळाची गरज आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी स्पष्ट केले. भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या (आयएनडीएल) सभेमध्ये ते बोलत होते. या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपविरोधी एकीचे दर्शन घडवण्यात आले.

दिवंगत उपपंतप्रधान देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र आणि आयएनडीएलचे नेते ओमप्रकाश चौताला यांनी ही सभा बोलावली होती. या वेळी नितीश कुमारांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल, माकपचे सीताराम येच्युरी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिवसेनेचे अरिवद सावंत आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र काँग्रेसचा एकही नेता सभेत दिसला नाही.

‘‘भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र आले तर देशाचे नुकसान करणाऱ्यांना दूर केले जाऊ शकते. राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण केली जात आहे. तिसरी आघाडी न करता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास आपण सहज विजयी होऊ शकतो,’’ असे नितीश कुमार म्हणाले. सभास्थळी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांचे एकीचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, २०२४मध्ये केंद्रामध्ये सत्ताबदल घडावा यासाठी सर्वानी एकत्रित काम करण्याची वेळ आली आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र बराच काळ सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.

नितीश-सोनिया भेट

हरियाणातील सभेनंतर लगेचच नितीश कुमार यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. नितीश कुमारांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर सोनियांसोबत ही पहिलीच भेट होती. राजदचे ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादवही यावेळी उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष निवडीनंतर आपण पुन्हा भेटू, असे आश्वासन सोनियांनी दिले. या घडामोडींमुळे काँग्रेससह विरोधी आघाडीच्या प्रयत्नांना अधिक जोर आल्याचे मानले जाते.