राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी आज संसद भवनात अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गेंसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. गेल्या आठवड्यातच एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक वैयक्तिक लढतीपेक्षा खूप महत्वाची
भाजपा खासदार जयंत सिन्हा यांनी आपले वडील यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला नाही. यामुळे मी कोणत्याही धर्म संकटात नाहीय. माझा मुलगा त्याचा राजधर्म पाळेल आणि मी माझा राष्ट्रधर्म पाळेन, असे यशवंत सिन्हा यांनी म्हणले आहे. तसेच राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक वैयक्तिक लढतीपेक्षा खूप महत्वाची असून सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तींचा विरोधात हे एक पाऊल आहे. असंही सिन्हा म्हणाले.
विरोधी पक्षापुढे भाजपाचे आव्हान
येत्या १८ जुलैला राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी मतदान घेण्यात येणार असून २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. विरोधी पक्षासमोर भाजपाचे कडवे आव्हान आहे. लोकसभा, राज्यसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपाचे संख्याबळ पाहता विरोधी पक्षासाठी ही निवडणूक अवघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.