Opposition Slams PM Modi over Petrol Diesel Price Hike: मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून इंधन संकट ओढवले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल-इराणचे युद्ध सुरू झाले. त्यानंतर भारतात एलपीजीची टंचाई निर्माण झाली. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे भाजी-पाला, अन्नधान्यासह इतर खाद्यपदार्थ आणि जीवनाश्यक वस्तू महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे. यावरून आता विरोधकांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर काय?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर डिझेलचे दर ९३ रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत.

पेट्रोलचे चार शहरातील दर:

मुंबई: १०६.६८ रुपये (३.१४ रुपयांची वाढ)
दिल्ली: ९७.७७ रुपये (३.०० रुपयांची वाढ)
कोलकाता: १०८.७४ रुपये (३.२९ रुपयांची वाढ)
चेन्नई: १०३.६७ रुपये (२.८३ रुपयांची वाढ)

Share market rise despite petrol diesel price hike | पेट्रोल डिझेल दरवाढ आणि शेअर बाजार तेजी | Sensex hits 75720 after fuel price rise | आशियाई बाजार घसरण आणि भारतीय शेअर बाजार
इंधन दरवाढीनंतरही सेन्सेक्स ७५,७२० वर, गुंतवणूकदारांचा उत्साह. (AI Generated Iamge)

डिझेलचे चार शहरातील दर:

मुंबई: ९३.१४ रुपये (३.११ रुपयांची वाढ)
दिल्ली: ९०.६७ रुपये (३.०० रुपयांची वाढ)
कोलकाता: ९५.१३ रुपये (३.११ रुपयांची वाढ)
चेन्नई:९५.२५ रुपये (२.८६ रुपयांची वाढ)

‘मोदींची वसूली सुरू’, काँग्रेसची टीका

काँग्रेसने एक्स पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्यांनी मोदींना ‘महागाई मॅन’ असे संबोधले आहे. “महागाई मॅन मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेवर हंटर चालवला. पेट्रोल आणि डिझेल तीन रुपयांनी महाग केले. तर सीएनजीच्या दरातही दोन रुपयांनी वाढवले. निवडणुका संपताच मोदींची वसूली सुरू झाली”, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

चार राज्यांच्या निवडणुकीनंतर दरवाढ

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली जाईल, असे सांगितले होते. “डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होऊन १०० च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर औद्योगिक इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर आगामी काळात येऊ घातलेल्या महागाईचे स्पष्ट संकेत आहेत”, असे सुतोवाच राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात केले होते.

राहुल गांधी पुढे म्हणाले होते की, रुपयाची घसरण, इंधनाचे वाढलेले दर यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या साखळीवर परिणाम होणार आहे. केंद्र सरकार या चिंताजनक परिस्थितीला सामान्य असल्याचे सांगत असले तरी हे वास्तव नाही. याची झळ प्रत्येक सामान्य कुटुंबीयांच्या खिशाला बसेल.

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि केरळ राज्यात नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. ४ मे रोजी निकाल लागल्यानंतर आता देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

इतर पक्षांचीही टीका

निवडणुकानंतर इंधनाचे दर वाढतील हे अपेक्षितच होते, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. तसेच पश्चिम बंगालमधील नवनियुक्त भाजपा सरकारला टोला लगावताना टीएमसीने म्हटले की, लोकांवरील महागाईचा भार कमी करण्यासाठी नवे सरकार पेट्रोलवरील व्हॅट कमी करणार का?

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनीही एक उपरोधिक पोस्ट करत इंधन दरवाढीवरून टोला लगावला.

अखिलेश यादव यांनी सायकवरून जातानाचे स्वतःचे व्यंगचित्र शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये ते म्हणाले, “जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर सायकल हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही आधीच ठरवले होते की, आम्ही सायकलनेच प्रवास करत राहू.” सायकल हे समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

भाजपाकडून दरवाढीची पाठराखण

दरम्यान इंधनाचे दर वाढल्यानंतर चहुबाजूंनी टीका होत असताना भाजपानेही या निर्णयाची पाठराखण करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. मध्यपूर्वेतील युद्धानंतर जगभरातील इतर देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती वाढले आणि त्यातुलनेत भारतात स्थिती काय आहे? याचा एक तक्ता भाजपाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केला आहे. तर हाच तक्ता केंद्रीय मंत्री आणि इतर नेत्यांनीही शेअर केला आहे.

युद्धामुळे जगभरातील इंधनाचे दर भडकले असून पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये ५५ टक्के, मलेशिया ५६, अमेरिका ४५, यूएइ ५२ आणि म्यानमारमध्ये जवळपास ९० टक्क्यांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत, असे भाजपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जगभरात ५० ते १०० टक्क्यांच्या घरात इंधनाचे दर वाढले असताना भारतात मात्र पेट्रोल ३.२ टक्के आणि डिझेल ३.४ टक्क्यांनी वाढले असल्याचे भाजपाने म्हटले.