Rahul Gandhi reaction Amit Shah Parliament Monsoon Session : संसदेतील प्रलंबित कोंडी संपवण्याच्या प्रयत्नात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी विरोधी पक्षांना चर्चेसाठी २४ तासांची मुदत दिली. ते म्हणाले की, ते त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असून, बुधवारी दुपारी ३ वाजल्यापासून गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सभागृहात उपस्थित राहतील. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “त्यांना काय म्हणायचे आहे याची आम्हाला पर्वा नाही,” असं म्हणत ही ऑफर फेटाळून लावली आहे.
अमित शाहांच्या लेक्चरमध्ये रस नाही
“अमित शाह सभागृहात काय बोलणार आहेत, त्यांच्या लेक्चरमध्ये आम्हाला रस नाही. विद्यार्थ्यांवर कोणी गोळीबार केला? गोळीबाराचे कोणी आदेश दिले? कोणी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर आणि कानावर गोळीबार केला. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते? गृहमंत्र्यांकडून आदेश आले होते का. दिल्ली पोलिस हे गृहमंत्र्यांचं सिस्टम आहे. अमित शाहांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते का. जर त्यांनी आदेश दिले असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा”, असं राहुल गांधी म्हणाले.
“अमित शाह निवेदन सादर करायला सभागृहात कधी येणार आहेत, हा प्रश्न नाहीय. त्यांना काय म्हणायचं आहे याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. या २० दिवसांत ते गायब होते. ते इथेच (संसदेत) बसले होते. गाडी येत होती, जात होती. ३० गाड्या त्यांच्याभोवती असायच्या, त्यांच्या घराभोवती हजारो पोलीस होते. फुग्यातून हवा निघून गेली. शेवटच्या क्षणी ते हवा भरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण फुगा फुटला आहे. अमित शाहांमध्ये हिंमत नाहीय. ते संसदेत येत नाहीयत”, असं राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले अमित शाह?
“बेपत्ता, पळून गेले, घाबरले आहेत अशा प्रकारची भाषा भारताच्या सार्वजनिक जीवनात आणि संसदीय कामकाजात अलिकडे ऐकायला मिळत आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून मी संसदेत येतोय, माझ्या दालनात बसलोय. विरोधक दोन्ही सभागृह चालूच देत नाहीयेत, मग जाऊन काय करायचं? नीटच्या विद्यार्थी आंदोलनाशी निगडीत सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलंय. आम्ही आता वेळ निश्चित करा असं सांगितलंय, हीच तर त्यांची मागणी होती, मी देखील स्पष्ट केलंय की, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार आहे. पण, त्यांना चर्चाच होऊ द्यायची नाही, अता कोण पळून जातंय हे जनतेने ठरवावे”, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
दोन वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र देण्याचे आवाहन
“विरोधकांनी आज दुपारी दोन वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र द्यावे आज तीनपासून उद्या तीनपर्यंत चर्चा करावी, मी सभागृहातच आहे. सगळ्यांना ऐकून घेईन, आणि सगळ्या गोष्टींची उत्तरं देईन, सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकार सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी तयार आहे, फक्त कामकाज चालू द्यावे”, असे आवाहन गृहमंत्री शाहांनी केले. “विरोधकांनी दोन वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र द्यावे चर्चा करावी आणि उद्या तीन वाजता मी उत्तर देईन”, असे शाह म्हणाले. “मला कोणीतरी या विषयावर वक्तव्य करण्यासाठी सांगतं पण एवढ्या गंभीर विषयावर अशा प्रकारे चर्चा होऊ शकत नाही”, असेही शाह म्हणाले.
