महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकार देशाला गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच युद्धजन्य परिस्थितीतही विरोधक राजकारण करत आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची मी भेट घेतली. महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर मी त्यांच्याशी चर्चा केली. अधिवेशन सुरु असलं की मी येत असतो. ही फक्त सदिच्छा भेट होती. मी दिल्लीत आलो, आपले खासदार आहेत. कोण टीका करतं आहे त्याकडे मी लक्ष देत नाही. मला जे करायचं ते मी करत असतो. विरोधक त्यांचं टीका करण्याचं काम करत असतात. कोण काय बोलतं आहे त्याचा विचार मी करत नाही.” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पंतप्रधान मोदींशी काय चर्चा झाली?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी इराण इस्रायल युद्धाबाबत चर्चा केली. देशातल्या सगळ्यांनी एकसंघ राहिलं पाहिजे. एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठिशी आहे. दुबई, मस्कत, कुवेतमध्ये जे भारतीय अडकले होते, त्यांना आणण्याचं कामही केलं आहे. मी मोदींना हेदेखील सांगितलं की अनेक देशांशी तुमचे चांगले संबंध आहेत. देश जेव्हा अडचणीत असतात तेव्हा एकमेकांना मदत करतो. इराणने होर्मुझमधून दोन जहाजं आली आहेत. याबाबतही चर्चा झाली आहे.”

किरेन रिजिजू यांनी श्रीकांत शिंदेंचं कौतुक केलं-शिंदे

ओम बिर्ला यांनाही मी भेटलो. काही मंत्र्यांचीही भेट झाली. किरेन रिजिजू यांनी श्रीकांत शिंदेंचं कौतुक केलं. श्रीकांत शिंदे चांगलं वागत असतो. त्याचेही सगळ्यांशी चांगले राजकीय संबंध आहेत. अमित शाह यांच्याशी भेट घ्यायची आहे. सध्या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी वेळ दिली तर मी त्यांना भेटेन.

विरोधक युद्धजन्य परिस्थितीतही राजकारण करत आहेत-शिंदे

विरोधी पक्ष, सत्ताधारी या सगळ्यांनी एकसंघ राहिलं पाहिजे. पंतप्रधानांना पाठिंबा दिला पाहिजे. पण दुर्दैवाने युद्धजन्य परिस्थितीत विरोधक राजकारण करत आहेत. अशा प्रसंगात राजकारण करता कामा नये. गॅसचा तुटवडा, इंधन तुटवडा आहे असं सांगत आहेत. त्यामुळे साठेबाजांना संधी मिळते हे ते लक्षात घेत नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी विरोधक असंच वागले. पाकिस्तानात हेडलाइन व्हाव्यात म्हणून काही लोक बोलतात हे काही योग्य नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. इंधनाचा बेकायदेशीर स्टॉक कुणीही करु नये. सिलिंडरचा तुटवडा भासू देणार नाही हे केंद्राने स्पष्ट केलं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ज्योती वाघमारेंबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

ज्योती वाघमारे या उच्चविद्याविभुषित आहेत. गरिबीतून आलेली आमची बहीण आहे. सामान्यांचा आवाज त्या राज्यसभेत उठवतील. सामान्यांना न्याय मिळवून देतील याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यांच्यावर जो विश्वास आम्ही दाखवला आहे तो विश्वास त्या सार्थ ठरवतील असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.