कारवाईसाठी देशातील विरोधी पक्षांच्या दहा नेत्यांची राष्ट्रपतींकडे हस्तक्षेपाची मागणी

संयुक्त राष्ट्रे/ लंडन, नवी दिल्ली : आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचा मृत्यू धक्कादायक असल्याचे संयुक्त राष्ट्रे आणि युरोपीय समुदायातील उच्चपदस्थ मानवी हक्क  अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या स्वामी यांना दहशतवादाच्या खोटय़ा आरोपांखाली कारागृहात डांबण्यात आले, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भारतातील विरोधी पक्षांच्या १० प्रमुख नेत्यांनीही राष्ट्रपती  रामनाथ  कोविंद यांना मंगळवारी पत्र लिहून स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क अधिकारी मेरी लॉलोर यांनी म्हटले आहे की, ‘‘भारतातून आलेले वृत्त हादरविणारे आहे. दहशतवादाच्या खोटय़ा आरोपाखाली अटक झाल्यानंतर नऊ महिन्यांनी मानवी हक्क कार्यकर्त्यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे, मानवी हक्क कार्यकर्त्यांला कारागृहात डांबणे अक्षम्य कृत्य आहे.’’

युरोपीय समुदायातील मानवी हक्क विशेष प्रतिनिधी इमॉन गिल्मूर यांनीही लॉलोर यांच्याशी सहमती दर्शविली आहे.

विरोधी नेत्यांचे राष्ट्रपतींना साकडे 

आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांना खोटय़ा गुन्ह्य़ांमध्ये गोवण्यास, त्यांना कारागृहातच डांबून ठेवण्यास आणि अमानवी वागणूक देण्यास जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधी पक्षांच्या १० नेत्यांनी कोविंद यांच्याकडे मंगळवारी एका पत्रान्वये केली आहे.

स्टॅन स्वामी यांचे उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात निधन झाल्यानंतर विरोधी नेत्यांनी हे पत्र पाठविले आहे. या पत्रावर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्याचप्रमाणे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, डॉ. फारुक अब्दुल्ला, तेजस्वी यादव, डी. राजा, सीताराम येचुरी यांच्याही या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधितांवर कारवाईसाठी राष्ट्रपती या नात्याने  आदेश द्यावेत, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.