कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्यांचं आंदोलन जंतरमंतरवर आलं आहे. कित्येक दिवसांपासून शेतकरी ठिय्या मांडून बसले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १४ भाजपा विरोधी पक्षाचे नेते जंतरमंतरवर पोहोचले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, डीएमके, आरजेडीसह डाव्या पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र आम आदमी पार्टी, टीएमसी आणि बीएसपी उपस्थित नव्हते. जंतरमंतरवर राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे, संजय राऊत, मनोज झा, डीएमकेचे टी शिवा उपस्थित होते. यावेळी शेतकरी वाचवा, भारत वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. विरोधक केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. गेल्या आठवड्यात दोन वेळा तर, बुधवारी कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांची विविध मुद्द्यांवर एकजुटीसाठी बैठक झाली होती.

“आम्ही आज शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत. सरकारला काळे कायदे रद्द करावे लागतील. त्यानंतरच हे आंदोलन संपेल.”, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलं. तसेच प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये मोदी घुसले आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

संसदेत कृषी कायदे आणि पेगॅससच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरुच आहे. विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेचं कामकाज ठप्प आहे. १९ जुलैला संसदेचं कामकाज सुरु झालं होतं. मात्र तेव्हापासून आतापर्यंत कामकाज ठप्प आहे.