वृत्तसंस्था, नवी दिल्ली

द्रमुक आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. जी. आर. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंगळवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिला. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ सह १२४अंतर्गत न्या. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग चालवावा अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.

द्रमुकचे खासदार टी. आर. बालू, ए. राजा, कन्निमोळी, दयानिधी मारन, समाजवादी पक्षाचे अखिलेख यादव आणि डिंपल यादव, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, गौरव गोगोई आणि मणिकम टागोर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत, आययूएमएलचे ई. टी. मुहम्मद बशीर, एआयएमआयएमचे असादुद्दीन ओवेसी, व्हीसीकेचे तिरुमावलन इत्यादी सदस्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

न्या. स्वामीनाथन यांच्या वर्तनामुळे त्यांची निष्पक्षता, धर्मनिरपक्षेकता आणि पारदर्शक कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. त्यामुळे गैरवर्तनाच्या कारणावरून त्यांच्याविरोधात महाभियोग चालवावा, अशी विनंती प्रस्तावात करण्यात आली आहे. ते एका विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या आधारे आणि राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या विरोधात निकाल देतात देतात, हेही कारण त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच न्या. स्वामीनाथन एका विशिष्ट समुदायाचे ज्येष्ठ वकील आणि वकिलांना झुकते माप देतात, असाही आरोप खासदारांनी केला आहे.

न्या. स्वामीनाथन यांनी गेल्या आठवड्यात मदुराईमधील तिरुपरनकुंद्रम टेकडीवर एका दर्ग्याजवळील स्तंभावर दीपज्वलनास परवानगी दिली होती. राज्य सरकारने त्या आदेशाचे पालन न करता त्याविरोधात अपील दाखल केले आहे.