नवी दिल्ली : राज्यसभेतील १२ खासदारांचे निलंबन केल्यामुळे विरोधी पक्षांनी मंगळवारी सत्ताधारी भाजविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसद भवनात बैठक आयोजित करून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी दिवसभरासाठी सभात्याग केला. लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर राज्यसभेत विरोधकांच्या अनुपस्थितीत प्रश्नोत्तर व शून्य प्रहराचे कामकाज घेण्यात आले.

राज्यसभेत दुपारच्या सत्रात धरणसुरक्षा विधेयक मांडले जाणार होते;  पण ‘विरोधक सभागृहात नाहीत, त्यांच्याशिवाय नवे विधेयक मांडणे योग्य वाटत नाही. बुधवारी निलंबनाच्या वादावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. मग, या विधेयकावर चर्चा करता येईल,’ अशी विनंती केंद्रीय संसदीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत केली. त्यावर उपसभापती हरिवंश यांनी सहमती दर्शवत सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले.

‘सभागृहाचे पावित्र्य राखण्यासाठी निलंबनाची कारवाई करणे गरजेचे होते; पण विरोधकांशिवाय सभागृहाचे कामकाज चालवण्याची केंद्र सरकारची मनीषा नाही. निलंबित खासदारांनी या सभागृहाची आणि देशाची माफी मागितली तर त्यांचे निलंबन मागे घेता येऊ शकते,’ असे राज्यसभेचे गटनेते पीयूष गोयल म्हणाले. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांनी एक पाऊल मागे घेतले तर केंद्र सरकारही तडजोड करू शकते, अशी सशर्त भूमिका घेतली.

संसद भवनातील विरोधकांच्या बैठकीनंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नायडू यांची भेट घेऊन निलंबन मागे घेण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला. मात्र खासदारांना आपल्या कृत्याबद्दल कोणताही खेद नसेल तर कारवाई मागे घेता येणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या बैठकीत दुसऱ्या दिवशीही तृणमूल काँग्रेसचे सदस्य सहभागी झाले नव्हते. राज्यसभेत खरगे यांनी निलंबन मागे घेण्याचा मुद्दा उपस्थित केला, पण त्यावर तोडगा न निघाल्याने प्रामुख्याने काँग्रेसच्या सदस्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

आजपासून धरणे

केंद्र सरकारने विरोधकांसमोर माफीचा प्रस्ताव ठेवला असला तरी, माफी कशासाठी? संसदेत लोकांचे म्हणणे मांडण्यासाठी?.. कधीही नाही! असे ट्वीट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी बुधवारपासून संसदेच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत निलंबित खासदार धरणे धरतील, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी जाहीर केले.

‘..तर माफी कशासाठी?’

राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या हौदात उतरून सदस्यांनी लोकांचे प्रश्न सरकारला ऐकायला लावले तर, त्यांनी कोणता गुन्हा केला? लोकांच्या व्यथा सभागृहात मांडणे, हा गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करू, त्यासाठी माफी मागण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी भूमिका मांडली.