नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी सुरू केली. या चौकशी विरोधात सत्ताधाऱ्यांचे विरोधक सोनियांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र गुरुवारी दिसले.

आतापर्यंत कुंपणावर असलेली तेलंगणा राष्ट्र समितीही गटात सामील झाली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी गुरुवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये टीआरएस सहभागी झाली होती. भाजपने नुकतेच हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन घेतले होते. तेलंगणामध्ये सत्तास्थापन करण्याचा ठरावही संमत केला होता. या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजपने दक्षिणेकडे पक्षाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. तेलंगणमध्ये भाजप हा आता टीआरएसचा प्रमुख विरोधक बनू पाहत आहे. त्यामुळे टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपतीच्या निवडणुकीतही टीआरएसने विरोधकांचे सर्वसंमत उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला होता.

अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे आणि त्यांचा अतोनात छळ होत आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि आपल्या समाजाची सामाजिक बांधणी नष्ट करणाऱ्या मोदी सरकारच्या लोकविरोधी, शेतकरी विरोधी आणि संविधानविरोधी धोरणांविरुद्ध आमचा सामूहिक लढा सुरू ठेवण्याचा आणि तीव्र करण्याचा संकल्प करतो, असे विरोधकांच्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर देखील टीआरएसने स्वाक्षरी केली आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा बारा विरोधी पक्षांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस मात्र उपस्थित नव्हती.

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कथित गैरव्यवहारा संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचीदेखील ईडीने ४० तास चौकशी केली होती. या चौकशी वेळी मात्र विरोधकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला नव्हता, ते पूर्णत: अलिप्त राहिले होते. सोनिया गांधी यांची गुरुवारी चौकशी सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मात्र सोनियांना पाठिंबा देत भाजपवर टीका केली. तपासणी यंत्रणांच्या जाणीवपूर्वक गैरवापराद्वारे राजकीय विरोधक आणि टीकाकारांविरुद्ध सूडाची अथक मोहीम सुरू केली अशी टीका विरोधकांनी केली.

राजकारणात शत्रू नसतात. मात्र पंतप्रधान मोदी विरोधी पक्षाला शत्रू मानतात. अलीकडेच हैदराबादमध्ये मोदी प्रादेशिक पक्षांबद्दल बोललेङ्घ ते घराणेशाहीबद्दल बोलले. ते आधी काँग्रेसमुक्त भारतबद्दल बोलत होते. आता त्यांचा मंत्र विरोधकमुक्त भारत हा आहे. भारत हुकूमशाहीच्या दिशेने  पुढे जात आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीचा मुद्दा संसदेतील दोन्ही सदनात काँग्रेसने उपस्थित करून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. सोनिया गांधींच्या चौकशी निमित्ताने काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले.  काँग्रेस मुख्यालय तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. संसदेच्या आवारातही नेत्यांनी, ईडीचा गैरवापर थांबवा, असे लिहिलेली फलके घेऊन निदर्शने केली. त्यावर, सर्वासाठी न्याय सारखाच असतो. सोनिया गांधी असामान्य व्यक्की आहेत का, असा सवाल केंद्रीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला.

भाजपकडून प्रत्युत्तर

काँग्रेसचा निषेध म्हणजे गांधी कुटुंबाच्या रक्षणासाठीचा ‘दुराग्रह’ असल्याची टीका भाजपने केली. ‘‘काँग्रेस ही एका कुटुंबाची संघटना बनली आहे आणि आता तिची मालमत्ताही कुटुंब खिशात घालत आहे,’’ असा आरोप भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधी कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवला.