नवी दिल्ली : ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र करत विरोधी पक्ष सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी  भेटीसाठी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे  वेळ मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली.

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीला (एसआयआर) स्थगिती द्यावी, मतदानासाठी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरू करावा आणि कथित मतचोरी थांबवावी, अशा मागण्यांचे निवेदन सरन्यायाधीशांना देण्यात येणार होते.

राहुल गांधी आणि खरगे यांनी सोमवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत भेट मिळावी, यासाठी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. देशातील जनतेच्या वतीने हे निवेदन सादर केले जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

युवक, सर्व विरोधी पक्ष, नागरी संघटना आणि संविधानावर विश्वास असलेले नागरिक या मोर्चात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने या आंदोलनाला ‘चलो दिल्ली-लोकशाहीसाठी मोर्चा’ असे नाव दिले आहे. सोमवारी दुपारी दीड वाजता कॅनॉट प्लेस-बडाखंबा रोड चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘लोकशाहीसाठी एकत्र चालू’

‘शनिवारी देशातील युवक शांततेने आंदोलन करण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यांच्या मनात द्वेष किंवा राग नव्हता, तर प्रेम होते. मात्र, पोलिस आणि भाजपच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली. आपल्याला असा भारत नको आहे,’ असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

देशभक्तीच्या भावनेने मोर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे भारताचा आवाज दाबू शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. ‘आम्ही प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीच्या भावनेने एकत्र मोर्चा काढू. घाबरू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.

खरगे यांनी बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे देशभरात अराजकता निर्माण झाल्याचा आरोप केला. शनिवारी दिल्लीतील आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करणे आणि आंदोलकांना ताब्यात घेणे, यातून युवकांच्या आंदोलनाची सरकारला भीती वाटत असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

भारतीय म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार आहोत. पक्ष, स्त्री-पुरुष, जात, समुदाय आणि राज्यांच्या भिंती ओलांडून आपण सर्वजण एकत्र चालणार आहोत. देशाच्या वतीने आम्ही सरन्यायाधीशांना निवेदन सादर करणार आहोत.     – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. हात जोडून आम्ही त्यांना देशातील परिस्थितीची माहिती देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरात अराजकता निर्माण केली आहे. लोकशाही आणि जनतेच्या घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी आमचा लढा सुरूच राहील. – मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

विद्यार्थ्यांचे, युवकांचे आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर केला जात आहे. सत्तेच्या अहंकारातून आणि कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर टिकून राहण्याच्या हट्टातून मोदी सरकारने संविधानाचा गंभीर अवमान केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी देशाची प्रतिष्ठा, लोकशाही संस्था कमकुवत करणे हा भारताशी द्रोह आहे.- जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस