लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नि:पक्षपातीपणाबद्दलच काँग्रेसने मंगळवारी सवाल उपस्थित केल्याने सभागृहात गदारोळ माजला. काँग्रेसच्या भूमिकेला सत्तारूढ सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला, लोकसभेच्या अध्यक्षांचा कोणालाही अवमान करता येणार नाही, असे सत्तारूढ सदस्य म्हणाले.
सभागृहात यावरून गदारोळ माजल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. सुमित्रा महाजन यांनी अमेठीतील फूड पार्कबाबत अन्नप्रक्रियामंत्री हरसिमरत कौर यांना निवेदन करण्याची अनुमती दिली. सरकारला त्याच विषयावर सातत्याने बोलण्याची अनुमती कशी दिली जाते, असा सवाल काँग्रेसने केला. काँग्रेसने दिलेली तहकुबीची सूचना अध्यक्षांनी नाकारली आहे.
काँग्रेसचे सदस्य दीपेंद्र हुडा म्हणाले की, ही बाब नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला अनुसरून नाही, हे स्वीकारार्ह नाही, अध्यक्ष योग्य न्याय देत नाहीत असे वाटते, असेही हुडा म्हणाले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच हुडा यांनी दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा आपला हेतू नव्हता, असे ते म्हणाले.