पीटीआय, नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या हस्तक्षेपानंतर दिल्लीतील प्रसिद्ध जाम मशिद प्रशासनाने मशिदीमध्ये मुलींना एकटय़ाने किंवा गटाने प्रवेशास प्रतिबंध करणारा वादग्रस्त आदेश गुरुवारी अखेर मागे घेतला. शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी सांगितले की, नायब राज्यपालांनी माझ्याबरोबर संपर्क साधला. आम्ही सूचना फलक हटवला आहे. मात्र मशिद पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पवित्रता राखावी लागणार आहे. दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिद प्रशासनाने मशिदीमध्ये मुलींना एकटय़ाने किंवा गटाने प्रवेशास बंदी केली होती. या संदर्भातील सूचना फलक प्रवेशद्वाजवळ लावण्यात आला होता. या निर्णयानंतर वाद निर्माण झाल्याने शाही इमाम यांनी हा आदेश नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुलींसाठी नाही, असे बुधवारी स्पष्ट केले. महिला अधिकार कार्यकर्त्यांनी हा निर्णय प्रतिगामी तसेच अस्वीकाहार्य आहे, असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मशिद प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले की, तीन मुख्य प्रवेशद्वारांच्या बाहेर काही दिवसांपूर्वी सूचना लावण्यात आली. त्यावर तारखेचा उल्लेख नाही. या सूचना फलकाकडे आताच लक्ष लागले. सूचनेनुसार जामा मशिदीत एकटी मुलगी अथवा मुलींना प्रवेशास बंदी आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही सूचना म्हणजे महिलांच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे म्हटले. या संबंधी एक नोटीस पाठवण्यात येणार आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणी कारवाईसंबंधी विचार सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order ban entry women jama masjid reversed administration decision intervention governor ysh
First published on: 25-11-2022 at 00:02 IST