मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेत अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगना राणावतची मागणी उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली. कारवाई सुरू करण्याचा महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश बेकायदा नाही, त्यात  अनियमितता नाही. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रशद्ब्राच नाही, असे न्यायालयाने  नमूद केले.

न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी गुरुवारी या प्रकरणी निकाल  दिला. अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून कारवाईचे आदेश दिल्याचे न्यायालयाने म्हटले. महानगरदंडाधिकाऱ्यांनी अख्तर यांची स्वत: साक्ष नोंदवली. कारवाईचे आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने अख्तर यांनी केलेली तक्रारही काळजीपूर्वक लक्षात घेतली. शिवाय कारवाईचा आदेश हा केवळ पोलीस अहवालावर आधारित नाही, तर तक्रारदाराच्या वक्तव्याच्या पडताळणीचे एकत्रित विश्लेषण करून  आणि अन्य कागदपत्रे लक्षात घेऊन देण्यात आले, असेही न्यायालयाने म्हटले.