क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याला अमेरिकी सैनिकांनी ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह खोल समुद्रात ‘दफन’ करण्यात आला होता हे तेव्हाच जाहीर झाले होते. परंतु त्याचा मृतदेह पाण्यावर येऊ नये यासाठी त्याच्या शवपिशवीत तब्बल ३०० पौंड वजनाच्या लोखंडी साखळ्या ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती या साऱ्या घटनाक्रमाचे साक्षीदार असलेले अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएचे तत्कालीन प्रमुख व विद्यमान संरक्षणमंत्री लिऑन पॅनेट्टा यांनी उघड केली आहे. अर्थात समुद्रात हा ‘दफनविधी’ नेमका कुठे पार पडला याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.
पॅनेट्टा यांचे ‘वर्दी फाइट्स : अ मेमॉयर ऑफ लीडरशिप इन वॉर अँड पीस’ हे पुस्तक आज प्रकाशित झाले. त्यामध्ये लादेनच्या मृत्यूपासून त्याचा मृतदेह समुद्रार्पण करण्यापर्यंतच्या घटनाक्रमाचा तपशील देण्यात आलेला आहे. लादेनला अबोट्टाबादमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आल्यानंतर आगोदर ठरल्यानुसार त्याचा मृतदेह समुद्रात उभ्या असलेल्या ‘यूएसएस कार्ल विन्सन’ या विमानवाहू युद्धनौकेवर नेण्यात आला. तेथे मुस्लिम रिवाजानुसार मृतदेह अन्त्यसंस्कारांसाठी तयार करण्यात आला. तो पांढऱ्या कापडात गुंडाळण्यात आला. अरेबिकमध्ये प्रार्थना म्हणण्यात आली. त्यानंतर मृतदेह एका जड काळ्या पिशवीत ठेवण्यात आला. मृतदेह पाण्यातून वर येऊ नये यासाठी त्या पिशवीत ३०० पौंड वजनाच्या लोखंडी साखळ्या ठेवण्यात आल्या. मृतदेह समुद्रार्पण करण्यासाठी ही पिशवी जहाजाच्या डेकवर एका पांढऱ्या टेबलवर ठेवण्यात आली. हे टेबल डेकवर अगदी कडेला ठेवण्यात आले होते. हे टेबल अगदी कडेला नेऊन समुद्रात कलते करायचे. म्हणजे पिशवी समुद्रात पडेल, अशी योजना होती. परंतु ही शवपिशवी एवढी जड झाली होती की, ती समुद्रात ढकलताना तिच्यासोबत ते टेबलही समुद्रात पडले. पिशवी समुद्रात पडल्यानंतर लगेच ती दिसेनाशी झाली. परंतु टेबल मात्र लगेच पुन्हा पाण्यावर अवतरले, असा ‘आँखो देखा हाल’ पॅनेट्टा यांनी या पुस्तकात वर्णन केला आहे.