Osama Bin Laden CIA Files India disclosure : ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने (CIA) ७० हून अधिक राष्ट्रपती गुप्तचर दस्तऐवज जाहीर केले आहेत. या नवीन दस्तऐवजांनुसार, सप्टेंबर ११ च्या हल्ल्यांच्या अनेक वर्षे आधी ओसामा बिन लादेन ज्या देशांवर हल्ले करण्याचा विचार करत होता, त्या संभाव्य लक्ष्यांमध्ये भारताचाही समावेश होता. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२८ ऑगस्ट १९९८ रोजीच्या एका राष्ट्रपती गुप्तचर अहवालात भारत, पाकिस्तान, इजिप्त, कुवेत, सौदी अरेबिया, येमेन आणि युगांडा या देशांची नावे समाविष्ट होती, जिथे तत्कालीन अल-कायदा प्रमुखाला हल्ले घडवून आणायचे होते. नायजेरियाचाही दुसरा संभाव्य देश म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र, या दस्तऐवजात भारतातील कोणत्याही विशिष्ट लक्ष्याचा उल्लेख नाही, किंवा असे हल्ले कधी आणि कसे केले जाऊ शकतात याचा तपशील दिलेला नाही.
११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने (CIA) शुक्रवारी जाहीर केलेल्या ७० हून अधिक राष्ट्रपती गुप्तचर दस्तऐवजांपैकी हा एक अहवाल आहे. एकूण १०० हून अधिक पानांचं हे दस्तऐवज असून, ९/११ च्या आधीच्या वर्षांत लादेनकडून असलेल्या धोक्याबाबत अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचे काय मूल्यमापन होतं, याची झलक यातून मिळते.
१९९८ च्या सीआयए अहवालात भारताविषयी काय म्हटलं होतं?
‘बिन लादेन नेटवर्क अजूनही एक धोका’ (Bin Ladin Terrorist Network Still a Threat) या शीर्षकाच्या ऑगस्ट १९९८ च्या अहवालात, अफगाणिस्तानमधील अल-कायदाच्या तळांवर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर लादेनच्या नेटवर्कच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. या गुप्तचर माहितीमागील स्त्रोत दस्तऐवजात लपवण्यात आला असला, तरी लादेनच्या आकांक्षा केवळ अमेरिकेविरुद्धच्या हल्ल्यांपुरत्या मर्यादित नव्हत्या, हे या दस्तऐवजातून स्पष्ट होते.
या अहवालानुसार, हल्ल्यांसाठी विचार केला जाणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होता. लादेनच्या नेटवर्कने आधीच प्रस्थापित केलेल्या भौगोलिक प्रभावाकडेही या दस्तऐवजाने लक्ष वेधलं होतं. “बिन लादेनची उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियातील मजबूत पायाभूत यंत्रणा पाहता, तो या प्रदेशांमधील अमेरिकन हितसंबंधांनाही लक्ष्य करेल या अहवालांना बळकटी मिळते”, असं यात म्हटलं होतं.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही अल-कायदा नेटवर्क टिकून राहिले
अमेरिकेने ऑगस्ट १९९८ मध्ये अफगाणिस्तानमधील अल-कायदाच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर हे गुप्तचर मूल्यमापन करण्यात आलं होतं. या हल्ल्यांनंतरही, अफगाणिस्तानमधून कार्यरत असलेला बिन लादेन आणि इतर दहशतवादी नेते जिवंत राहिले असून, “त्यांचे नेटवर्क अजूनही अबाधित आहे”, असं अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केलं होतं.
