लॉस एंजेलिस : लॉस एंजेलिस येथे रविवारी रात्री रंगलेल्या अठ्ठ्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यावर ‘वन बॅटल अफ्टर अनदर’ आणि ‘सिनर्स’ या चित्रपटांचे वर्चस्व राहिले. राजकीय विरोधाची भूमिका मांडणाऱ्या ‘वन बॅटल…’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पॉल थॉमस अँडरसन यांना दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.
तर १६ मानांकन मिळविण्याचे विक्रम करणाऱ्या भय-संगीतपट ‘सिनर्स’ला चारच पुरस्कार पटकावता आले. मायकेल बी जॉर्डन याला सर्वोत्तम अभिनेत्याचा, शॉन पेन यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेतेपदासाठी, जेसी बकली यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा तर एमी मॅडीगन यांना सहाय्यक अभिनेत्रीपदासाठीचा ऑस्कर मिळाला.
यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या गटात पहिल्यांदाच दोन परभाषिक चित्रपट होते. नॉर्वेचा ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’ आणि ब्राझीलचा ‘द सिक्रेट एजंट’ या परभाषिक गटातदेखील नामांकित असलेल्या चित्रपटांची स्पर्धा मुख्य पुरस्कारासाठी होती. यापैकी ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’ने परभाषिक चित्रपटाच्या पुरस्काराचा मान मिळविला. ऑस्कर मिळविणारा पहिला नॉर्वेजियन चित्रपट ही त्याची ओळख आता कायम राहील.
‘सिनर्स’ या चित्रपटाने १६ नामांकने मिळविण्याचा इतिहास घडविला होता. मात्र पटकथा, अभिनय, सिनेमॅटोग्राफी आणि संगीत अशा चार पुरस्कारांवर या चित्रपटाला समाधान मानावे लागले. ऑटम ड्युराल्ड अर्कापॉ या ऑस्कर मिळविणाऱ्या पहिल्या महिला सिनेमॅटोग्राफर बनल्या. यापूर्वी चार महिला सिनेमॅटोग्राफर्सना नामांकने मिळाली होती. मात्र पुरस्कार कुणाच्याच वाटेला आला नव्हता. रायन कुगलर यांना सिनर्सच्या पटकथेसाठी पुरस्कार मिळाला, तर लुडविग गोरान्सन यांना याच चित्रपटाच्या संगीतासाठी पुरस्कार मिळाला.
‘सिनर्स’ आणि ‘वन बॅटल’ याखेरीज सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी हॅम्नेट, फ्रॅँकेन्स्टाइन, कोरियन चित्रपटाचा रिमेक असलेला बुगोनिया, मार्टी सुप्रीम, एफ वन आणि ट्रेन ड्रीम्स यांच्यात चुरस होती. पैकी जेसी बकली यांना ‘हॅम्नेट’साठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘फ्रॅन्केन्स्टाइन’ला तांत्रिक गटातील पुरस्कार मिळाला. एफवनल ध्वनी गटातील पुरस्कार लाभला. बाकी अनेक पुरस्कार वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विभागले गेले. एमी मॅडीगन यांना ‘वेपन्स’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
‘वन बॅटल’ची यशस्वी स्पर्धा…
थॉमस पिंचन यांच्या ‘वाइनलॅण्ड’ या कादंबरीला आजच्या काळाशी जोडून तयार करण्यात आलेला हा चित्रपट. त्यातील क्रांती, युद्ध, हिंसा यांना आजच्या अमेरिकेतील अनेक प्रश्नांशी जोडतो. स्थलांतरितांच्या समस्यांपासून राजकीय भ्रष्ट यंत्रणांशी लढणाऱ्या अनेक घटकांशी कथानकाचा संदर्भ जोडला असला तरी पात्रांच्या भावनिक बाजूंना पडद्यावर मांडतो.
पॉल थॉमस अँडरसन यांना दिग्दर्शनासह याच्या रूपांतरित पटकथेसाठी पुरस्कार मिळाला. त्यासह खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या शॉन पेन यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सहाय्यक अभिनेत्यासाठी या चित्रपटातील बेनेशिओ डेल टोरो या आणखी एका अभिनेत्याला ऑस्करचे नामांकन मिळाले होते. संकलन आणि कास्टिंग या गटातदेखील या चित्रपटाला पुरस्कार मिळाला.
अन्य महत्त्वाचे पुरस्कार
केपॉट डिमन हंटर्स या ॲनिमेटेड चित्रपटाला या गटातील ऑस्कर मिळाले. ‘गोल्डन’ या याच चित्रपटातील गीतालादेखील सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार मिळाला. वेशभूषा, रंगभूषा, प्रॉडक्शन डिझाइन विभागात फ्रॅन्कॅन्स्टान चित्रपटाने बाजी मारली, तर अवतार-३ ला तांत्रिक विभागात ऑस्कर मिळाले. मिस्टर नोबडी अगेन्स्ट द पुतिन या चित्रपटाला माहितीपट गटातील पुरस्कार मिळाला.
