केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद देशाचे लोकसंख्येबाबतचे धोरण बदलण्यात येऊन सर्व धर्माच्या लोकांना फक्त दोन अपत्ये असावीत हा निकष अनिवार्य केला नाही, तर ‘आमच्या मुली’ सुरक्षित राहणार नाहीत आणि मुलींना पाकिस्तानप्रमाणे बुरख्यात ठेवावे लागेल, असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार असलेल्या सिंह यांच्या या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सिंह यांच्या विधानाचा उद्देश अल्पकाळाच्या राजकीय फायद्यासाठी हिंदू व मुस्लीम यांच्यात फूट पाडण्याचा असल्याचे सांगून त्यांनी सिंह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. हिंदूंचे दोन मुलगे असतील तर मुस्लिमांचेही दोनच मुलगे असले पाहिजेत. आपली लोकसंख्या कमी होत चालली आहे. बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत की तेथे आपली लोकसंख्या घटत चालली आहे. लोकसंख्या नियंत्रणाचे नियम बदलण्याची गरज आहे आणि तेव्हाच आपल्या मुली सुरक्षित राहतील. अन्यथा पाकिस्तानप्रमाणे आपल्यालाही मुलींना बुरख्यात ठेवावे लागेल, असे पश्चिम चंपारण जिल्ह्य़ातील बागाहा येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना गिरिराज सिंह बुधवारी म्हणाले होते. देशात असा कायदा हवा, की ज्यायोगे हिंदू, मुस्लीम, शीख किंवा ख्रिस्ती यापैकी कुठल्याही धर्माच्या कुटुंबांना सारखीच मुले असण्याची परवानगी असावी. लोकसंख्याविषयक धोरण सर्वासाठी समान असायला हवे आणि आपला देश विकसित राष्ट्र व्हावा असे वाटत असेल तर लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे, असे सिंह यांनी सांगितले होते. या विधानबद्दल विरोधी पक्षांनी हल्ला चढवल्यानंतर सिंग यांनी हे वक्तव्य देशहितार्थ होते असे सांगून त्याचे समर्थन केले. चीनसारख्या देशाने १९७९ साली लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला आणि आता मलेशिया, इंडोनेशिया व बांगलादेश यांनीही हा कायदा अमलात आणला आहे. तसाच मजबूत कायदा भारतातही हवा, असे आपले मत असल्याचे ते म्हणाले. सिंह यांचे हे वक्तव्य वाईट अभिरुचीचे असून, त्यांचे सरकार लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्दय़ावर काय विचार करते हे त्यांनी आधी विचारावे, असे जद (यू)चे नेते शरद यादव म्हणाले. तर, सिंह यांच्या वक्तव्याचा उद्देश अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडणे हा असल्याचे या पक्षाचे दुसरे नेते पवन वर्मा म्हणाले.