Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India : विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना नुकताच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे झाला. भव्य स्टेडिअमवर झालेल्या या सामन्याकडे अवघ्या जगाचं लक्ष होतं. भारतातील सर्व क्रिकेटमंडळी रविवारी भारतीय संघ जिंकेल या आशेवर होते. परंतु, ऐनवेळेला भारतीय संघ कमकुवत पडला आणि ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यावेळी अनेक दिग्गज नेते, सेलिब्रिटीमंडळी स्टेडिअमवर हा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हा सामना पाहण्यासाठी हजर होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
“आपली मुलं चांगल्या पद्धतीने वर्ल्ड कप जिंकले असते. पण तिथं पनवतीमुळे आपण हरलो”, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही. परंतु, त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. त्यांच्या या वाक्याने जनसमुदायातून हर्षोल्लासाचा आवाज आला. “टीव्हीवाले हे नाही सांगणार की (कोण पणवती), पण जनतेला माहितेय”, असंही ते पुढे म्हणाले. काँग्रेसने यासंदर्भातील व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.
भाजपाचं प्रत्युत्तर
राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवरून आता त्यांनी माफी मागावी अशी भाजपाने मागणी केली आहे. भाजपाचे नेते रवी शंकर यांनी टाईम्सा दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, तुम्हाला काय झालंय राहुल गांधी? तुम्ही देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरत आहात. आपल्या पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांचं मनोबल उंचावलं. हरणं आणि जिंकणं हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे.
“तुम्ही तुमच्या इतिहासातून शिकलं पाहिजे. तुमच्या आई सोनिया गांधी मोदींना मौत का सौदागर म्हणायच्या आणि आता काँग्रेसची अवस्था काय झाली आहे बघा”, असंही रवी शंकर प्रसाद म्हणाले.
दरम्यान, विश्वचषक २०२३ मध्ये भारताची कामगिरी चांगली राहिली. अटीतटीच्या ठरलेल्या अनेक सामन्यांत भारताने डाव साधला. त्यामुळे अंतिम सामनाही आपल्याच पदरात पडेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. याकरता सर्व स्तरातून भारतीय खेळाडूंसाठी शुभेच्छा आल्या होत्या. इतकंच नव्हे तर उपास-तापास, होम-हवनही करण्यात आलं होतं. हा क्षण स्टेडिअमवर जाऊन पाहण्याकरता अनेकांनी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गर्दी केली होती. यामध्ये अनेक राज्यातील नेते, मंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह रणबीर कपूर वगैरे मंडळी हजर होती. परंतु, ऐनवेळी समस्त भारतीयांचं स्वप्न धुळीस मिळालं.