नवी दिल्ली : २०१२ पासून भारतात तब्बल एक हजार ५९ वाघांचा मृत्यू झाला. यामध्ये ‘वाघांचे राज्य’ म्हणून ख्याती असलेल्या मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) माहितीनुसार यंदा ७५ वाघांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी २०१२ ते २०२२ या कालावधीतील सर्वाधिक १२७ वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२० मध्ये १०६, २०१९ मध्ये ९६,  २०१८ मध्ये १०१, २०१७ मध्ये ११७, २०१६ मध्ये १२१, २०१५ मध्ये ८२, २०१४ मध्ये ७८, २०१३ मध्ये ६८ आणि २०१२ मध्ये ८८ वाघांचा मृत्यू

झाला. सहा व्याघ्र प्रकल्प असलेल्या मध्य प्रदेशात सर्वाधिक २७० वाघांचा या कालावधीत मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रात १८३, कर्नाटक १५०, उत्तराखंड ९६, आसाम ७२, तमिळनाडू ६६, उत्तर प्रदेश ५६ आणि केरळ ५५ मृत्यूंची नोंद आहे.

राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात अनुक्रमे २५, १७, १३, ११ आणि ११ वाघांच्या मृत्यूची नोंद आहे.

दीड वर्षांत महाराष्ट्रात ४२ वाघांचा बळी

मध्य प्रदेशात गेल्या दीड वर्षांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले. तर महाराष्ट्रात या कालावधीत ४२ वाघांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार २०१२ ते २०२० या कालावधीत १९३ वाघांची शिकार करण्यात आली. तर जानेवारी २०२१ पासून ही संख्या उपलब्ध नाही.