गेल्या अकरा वर्षांत २१ लाख भारतीय तंत्रज्ञांनी अमेरिकेच्या एच १ बी व्हिसासाठी अर्ज केले होते, असे अधिकृत अहवालात म्हटले आहे. एकूण एच १ बी व्हिसात ७० ते ८०  टक्के  भारतीयांचा समावेश दरवर्षी असतो असे सांगण्यात आले.

अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर विभागाने म्हटले आहे, की ज्यांनी या व्हिसासाठी अर्ज केले होते, ते उच्च विद्याविभूषित होते. ११ वर्षांत त्यांचे वेतन साधारण ९२३१७ डॉलर्सपर्यंत गेले होते. त्यातील बहुतांश अर्जदार हे पदवी व पदव्युत्तर पदवी असलेले होते. २००७ पासून यंदाच्या जूनपर्यंत एच १ बी व्हिसासाठी ३४ लाख अर्ज आले, त्यातील २१ लाख भारतातील लोकांचे होते. याच काळात २६ लाख लोकांना अमेरिकेने एच १ बी व्हिसा दिला, त्यात देशांनुसार आकडे मात्र जाहीर करण्यात आले नाहीत. एकूण अर्जापैकी दुसरा क्रमांक चीनचा (२९६३१३) तिसरा  फिलिपिन्सचा (८५९१८), चौथा दक्षिण कोरियाचा (७७३५९) तर पाचवा कॅनडाचा ( ६८२२८) होता. २३ लाख लाभार्थी हे २५ ते ३४ गटातील होते, तर २० लाख लाभार्थी हे संगणक क्षेत्रातील होते.

वास्तूरचना, अभियांत्रिकी यातील ३१८६७०, तर शिक्षण क्षेत्रातील २४४००० लाभार्थी होते. प्रशासनातील २४५०००, वैद्यक व आरोग्यातील १८५००० लोकांना एच १ बी व्हिसा मिळाला होता. ११ वर्षांत ६५ वर्षांवरील २ हजार नागरिकांना हा व्हिसा मिळाला. एच १ बी व्हिसाधारकांचे वेतन २००७ मध्ये ६८१५९ डॉलर्स होते ते २०१७ मध्ये  ९२३१७ डॉलर्स झाले. जास्त व्हिसाधारक भारताचे होते. दरवर्षी किमान ७० ते ८० टक्के एच १ बी व्हिसाधारक हे भारताचे असतात. ट्रम्प प्रशासन सध्या एच १ बी व्हिसा धोरणाचा फेरआढावा घेत असून तसे आश्वासन त्यांनी निवडणूक प्रचारात दिले होते.