उत्तराखंडमधील महापुराला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही अजून तिथल्या प्रत्येक गावात मदतकार्य पोहोचलेले नाही. काही गावांमध्ये अद्याप अन्नधान्य पुरविण्यात आले नसून, काही ठिकाणी आलेले अन्नधान्य ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. वास्तविक गावातील प्रत्येकाला अन्नधान्य पुरवण्यासाठी ते ग्रामपंचायतीकडे देण्यात आले होते. मात्र, अद्याप ते सामान्यांपर्यंत न पोचल्याने पूरग्रस्तांमध्ये संतापाची भावना आहे.
पुढील ७२ तासांत उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकार मदतीसाठी आणलेल्या वस्तू लवकरात लवकर गावोगावी पोचवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, याच वस्तू सर्व ठिकाणी पोहोचत नसल्याचे आढळून आले. महापुराचा रुद्रप्रयाग जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. याच जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक अजून अन्नधान्य मिळण्याची वाट बघत असल्याचे चित्र आहे.
रुद्रप्रयाग ते गुप्तकाशी हा रस्ता महापुरात वाहून गेल्यामुळे मदतकार्य घेऊन जाणारे ट्रक हे तेहरी धरणाच्या बाजूने गुप्तकाशीपर्यंत आणि तिथून पुढे फाटापर्यंत नेण्यात येत आहे. तिथेही आसपासच्या गावात राहाणाऱया गावकऱयांना डोंगर चढून जवळील रस्त्यापर्यंत येऊन मदत म्हणून देण्यात येत असलेले अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जावे लागताहेत. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ तालुक्यातील गिवानी गावामध्ये अजून कोणतीच मदत पोहोचलेली नाही. या गावातील विजेंदर प्रसाद भट म्हणाला, रस्त्याने जाऊ शकणाऱया भागामध्येच मदतकार्य पोहोचत आहे. आमच्यासारख्या डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अजून कोणतीच मदत मिळालेली नाही.