सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाबरी मशिदीचा वाद शांत झाला आहे. हा वाद शांत होताच आता वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा वाद समोर आला आहे. वाराणसी येथील एका स्थानिक न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी एक पथक मशिद परिसरात आल्यानंतर, मोठा तणाव निर्माण झाला होता. आता हा वाद वाढत चालला आहे. असं असताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी याप्रकरणी खोचक टिप्पणी केली आहे.

“भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १९९० च्या दशकातील द्वेषाचं युग पुन्हा जागृत करायचं आहे”, अशा शब्दांत ओवेसी यांनी टिप्पणी केली. यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी रविवारी असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली ओवेसी यांना तातडीनं अटक करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हरनाथ यादव म्हणाले की, “ओवेसी यांचा हेतू समजून घेणं गरजेचं आहे. ओवेसी यांना देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. ते जिना बनण्याचं स्वप्न बघत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब तुरुंगात टाकावं,” अशी मागणी यादव यांनी यावेळी केली.

खरंतर, वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा वाद सध्या उफाळत आहे. कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही संस्था न्यायालयात जाण्यास स्वतंत्र आहे. याचाच एक भाग म्हणून मुस्लीम पक्षाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पण न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मुस्लीम पक्षाने न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा, असंही ते पुढे म्हणाले.

तसेच ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातून कोणतं सत्य समोर येईल, अशी भीती ओवेसी यांना आहे, असा सवालही हरनाथ यादव यांनी उपस्थित केला आहे. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत दिलेल्या निकालाचा सर्व समुदायांनी स्वीकार केला. त्यामुळे ज्ञानवापी मशिदी सर्वेक्षण प्रकरणात देखील मुस्लिमांनी स्थानिक न्यायालयाचा आदेश स्वीकारला पाहिजे. रामजन्मभूमीच्या निकालानंतर मुस्लीम बांधवांनी ज्या पद्धतीनं देशात जातीय सलोखा निर्माण केला आणि तो स्वीकारला, त्याच पद्धतीनं मुस्लिमांनी स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला परवानगी द्यावी, असंही यादव म्हणाले.