scorecardresearch

जगात आर्थिक विषमतेमुळे दररोज २१ हजार लोकांचा मृत्यू ; करोना साथीमुळे ९९ टक्के लोकांच्या उत्पन्नात घट

ऑक्सफॅमच्या मते, जगातील अब्जाधीशांची संपत्ती गेल्या १४ वर्षांत वाढली नव्हती, इतकी करोना महासाथ सुरू झाल्यापासून वाढली आहे.

नवी दिल्ली/  दाव्होस : करोना महासाथीच्या सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये ९९ टक्के लोकांचे उत्पन्न घसरले, तर १६ कोटींहून अधिक लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले गेले; याउलट जगातील १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचे उत्पन्न दुपटीहून अधिक वाढून १.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलपर्यंत (१११ लाख कोटींहून अधिक) पोहोचले. उत्पन्नवाढीचा हा दर दररोज तब्बल १.३ अब्ज अमेरिकी डॉलर (९ हजार कोटी रुपये) इतका होता, असे सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे.

ही असमानता दररोज किमान २१ हजार लोकांच्या किंवा दर चार सेकंदांना एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे ‘इनइक्वॅलिटी किल्स’ अशा शीर्षकाच्या आणि वल्र्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाइन दाव्होस अ‍ॅजेंडा परिषदेच्या पहिल्या दिवशी जारी करण्यात आलेल्या अहवालात ऑक्सफॅमने म्हटले आहे.

आरोग्य सुविधांचा अभाव, लिंगाधारित हिंसाचार, भूक आणि वातावरणातील आत्यंतिक बिघाड यांच्यामुळे जगभरात झालेल्या मृत्यूंवर या अहवालाचे पारंपरिक निष्कर्ष आधारित असल्याचे यात नमूद केले आहे.

ऑक्सफॅमच्या मते, जगातील अब्जाधीशांची संपत्ती गेल्या १४ वर्षांत वाढली नव्हती, इतकी करोना महासाथ सुरू झाल्यापासून वाढली आहे. नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली तेव्हापासून ५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरची ही आजवरची सर्वात मोठी वाढ आहे.

१० सर्वाधिक श्रीमंतांना अलभ्य लाभ

महासाथीच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये जगातील १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचे नशीब दर सेकंदाला १५ हजार अमेरिकी डॉलर इतक्या गतीने फळफळले. या दहा जणांनी त्यांच्या संपत्तीपैकी ९९.९९९ टक्के संपत्ती उद्याच गमावली, तरीदेखील ते पृथ्वीवरील सर्व लोकांपेक्षा ९९ टक्के अधिक श्रीमंत राहणार आहेत.

 ‘या लोकांजवळ सध्या सर्वाधिक ३.१ अब्ज लोकांपेक्षा सहापट अधिक संपत्ती आहे’, असे ऑक्सफॅमचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी संचालक गॅब्रिएल बुचर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oxfam report 2021 income households fell death in coronavirus period zws