ज्या लोकांनी ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका लशीची पहिली मात्रा घेतली आहे त्यांनी नंतर एमआरएनए लशीची मात्रा घेतली तर करोना संसर्गाचा धोका कमी राहतो, असे एका तुलनात्मक अभ्यासात म्हटले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या दोनही लशी परिणामकारक असल्या तरी अ‍ॅस्ट्राझेनेका व एमआरएनए लस यांच्या संमिश्र वापराने जास्त फायदा होतो असे दिसून आले आहे.

  हा अभ्यास स्वीडनमध्ये करण्यात आला. अ‍ॅस्ट्राझेनेका ही विषाणूवर आधारित लस असून ६५ वर्षाखालील व्यक्तींसाठी या लशीचा वापर थांबवण्यात आला आहे. त्याला सुरक्षेची काही कारणे आहेत. स्वीडनमधील बहुतांश लोकांनी अ‍ॅस्ट्राझेनेकाची पहिली मात्रा घेतली असून दुसरी मात्रा एमआरएनए लशीची घेण्यात यावी असे म्हटले आहे.

   स्वीडनमधील उमिया विद्यापीठाचे प्राध्यापक पीटर नॉर्डस्ट्रॉम यांनी म्हटले आहे की, कुठलीही लस न घेण्यापेक्षा कुठलीतरी मान्यताप्राप्त लस घेणे केव्हाही चांगले. दोन मात्रा घेणे हे एका मात्रेपेक्षा नेहमीच चांगले आहे. असे असले तरी ज्या लोकांनी अ‍ॅस्ट्राझेनेकाची पहिली लस घेतली व नंतर एमआरएनए लशीची मात्रा घेतली त्यांच्यात करोना प्रतिबंधक क्षमता जास्त दिसून आली आहे. ज्यांनी दोन्ही मात्रा अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या घेतल्या आहेत त्यांच्या तुलनेत अ‍ॅस्ट्राझेनेका व एमआरएनए लस संमिश्र वापरणाऱ्या लोकांमध्ये जास्त फायदा दिसून आला आहे.

   हा अभ्यास दी लॅन्सेट रिजनल हेल्थ- युरोप या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून यात राष्ट्रीय नोंदणीकृत माहितीचा वापर करण्यात आला. एकूण सात लाख लोकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. दुसऱ्या मात्रेनंतर अडीच महिने निरीक्षण करण्यात आले.

  यात असे दिसून आले की अ‍ॅस्ट्राझेनेका व फायझर   या लशींचा वापर संमिश्रपणे केल्याने जोखीम ६७ टक्के कमी होते.

अ‍ॅस्ट्राझेनेका व मॉडर्ना या लशी संमिश्र घेतल्यास जोखीम ७९ टक्के कमी होते. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या दोन मात्रा घेतल्याने जोखीम पन्नास टक्के कमी होते.