ऑक्सफोर्ड लसीचे दोन डोस नव्या व्हेरियंटवर प्रभावी!

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अहवालात दावा

सौजन्य- Indian Express

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जगात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. करोनावर बाजारात विविध लस उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणती लस सर्वाधिक प्रभावी याबाबत चर्चा सुरु झाली आहे. भारतात आढळलेल्या करोनाच्या नव्या व्हेरियंटवर ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या लसीचा एक डोस प्रभावी नसल्याचं दिसून आलं आहे. यासाठी लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंग्लंड सरकारच्या रिसर्च समितीने केलेल्या सखोल अभ्यासात ही बाब समोर आली आहे. लसीचे दोन डोस घेतल्याने B.1.617.2 व्हेरियंटवर ८१ टक्के, तर इंग्लंडमधील केंटमध्ये आढळेल्या B.1.1.7 व्हेरियंटवर ८७ टक्के प्रभावी असल्याचं पब्लिक हेल्थ इंग्लंडने जारी केलेल्या अहवालात सांगितलं आहे.

लसीचा एक डोस घेतल्यानंतर केलेल्या अभ्यासात B.1.617.2 व्हेरियंटवर ३३ टक्के, तर B.1.1.7 व्हेरियंटवर ५१ टक्के इतकाच प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे ऑक्सफोर्ड लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

चिंता वाढली; दिल्लीत २ रुग्णांना दुर्मिळ ब्लॅक फंगसची लागण

भारतात मागच्या २४ तासात २.५७ लाख करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागच्या २० दिवसांची आकडेवारी पाहिली तर करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. ३ मे रोजी देशात १७.१३ टक्के रुग्ण होते. आता हा आकडा ११.१२ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही ८७.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ३० लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत. तर मागच्या २४ तासात ४ हजार १९४ जणांचा करोनामुळे जीव गेला आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सर्वाधिक करोना मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

“म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठीच्या औषधाची उपलब्धता आणि पुरवठा वाढवला”, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशातील ८ राज्यात १ लाखाहून अधिक सक्रिय करोना रुग्ण आहेत. ८ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाखादरम्यान करोना रुग्ण सक्रीय आहेत. तर २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ५० हजारांहून कमी रुग्ण असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशातील ७८ टक्के नवे रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. त्यापैकी ७ राज्यात प्रतिदिन १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Oxford astrazeneca vaccine two doses effective new corona variant says uk rmt