केंद्र सरकारने बुधवारी यूपीए सरकारच्या १० वर्षांमधील बहुतांश वर्षांतील एकत्रित राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी घटवली आहे. अपेक्षेप्रमाणे आता यावर राजकीय वादास सुरुवात झाली आहे. काँग्रेसने याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारचे हे पाऊल म्हणजे ‘वाईट विनोद’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चिदंबरम यांनी निती आयोगाच्या आकडेवारीला अत्यंत ‘वाईट विनोद’ असल्याचे सांगत म्हटले की, निती आयोगाने दुरुस्त केलेली आकडेवारी हा एक विनोद आहे. तो अत्यंत वाईट विनोद आहे. दरम्यान, निती आयोगाच्या उपाध्यक्षांनी मात्र चिदंबरम यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, काँग्रेस पक्ष केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) बौद्धिक आणि तांत्रिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. दहा प्रसिद्ध सांख्यिकी तज्ज्ञांनी या अहवालाची समीक्षा केली असून ही आकडेवारी तयार करण्यात त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे महत्व कमी केले जात असल्याचा आरोपही निती आयोगाच्या उपाध्यक्षांनी केला आहे.

दरम्यान, सरकारने जीडीपी आकडेवारी २००४-०५ च्या आधार वर्षाऐवजी २०११-१२ च्या आधार वर्षाच्या हिशोबाने दुरुस्त केली आहे. अर्थव्यवस्थेचे वास्तविक चित्र समोर येण्यासाठी सरकारने हे केल्याचे सांगण्यात येते. सीएसओद्वारे जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत २०१०-११ मध्ये अर्थव्यवस्थेची वाढ ८.५ टक्के होती. तर यापूर्वी १०.३ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज लावण्यात आला होता.

काँग्रेसकडून याप्रकरणी निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मोदी सरकार आणि त्यांचे बाहुले निती आयोगला विश्वास आहे की, २+२= ८ होतात. हाच त्यांचा दिखाऊपणा, चालबाजी, भ्रम पसरवण्याचा व्यवसाय ज्याला मागील आकडेवारी म्हणून विकले जात आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.