उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला असून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शिवाय राजकारण्यांनी एकमेकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोप करणं देखील नेहमीचच झालंय. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आम आदमी पक्षाला भाजपाचं प्रतिरुप म्हणत खरपूस समाचार घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राजधानी दिल्ली ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतच्या ‘मुख्यमंत्री तीर्थ यात्रा कार्यक्रमा’च्या पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर चिदंबरम यांनी हे विधान केलंय.

“अनुकरण हा लांगुलचालन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आप जितकं जास्त भाजपाचं अनुकरण करेल, तितका तो पक्ष अधिकाधिक संदर्भहीन होत जाईल. लवकरच आप हे भाजपाचंच प्रतिरुप होऊन जाईल.”

टाईम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, केजरीवाल यांनी २०१९ मध्ये सुरू केलेली ‘मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना’ राजधानीतील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी मोफत प्रवास पॅकेज देते. दिल्लीच्या प्रत्येक मतदारसंघातील ११०० लोकांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. वर्षभरात ७७ हजार भाविक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेची सुरुवात झाल्यापासून ३५०८० लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.  

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी ही योजना सुरू केल्यापासून ते सौम्य हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली होती. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी केजरीवाल या सर्व गोष्टी करत असल्याचंही विरोधक म्हणत आहेत.

“धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणे, दंगली घडवून आणणे आणि दलितांवर अत्याचार करणे हे हिंदुत्व नसून एका माणसाला दुस-या व्यक्तीशी जोडणे म्हणजे हिंदुत्व आहे,” असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता.