ज्येष्ठ पत्रकार, संपादक, दोन पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार, पद्मभूषण सन्मान प्राप्त एच. के. दुआ यांचे बुधवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आदिती आणि मुलगा प्रशांत असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी लोधी रस्ता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. दुआ १९९४-९६दरम्यान ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संपादकपद होते. दुआ यांनी भारताचे डेन्मार्कमधील राजदूत आणि राज्यसभेचे खासदार म्हणूनही काम केले होते. आपल्या चार दशकांच्या कार्यकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि एच. डी. देवेगौडा यांचे ते माध्यम सल्लागार होते. राजनैतिक अधिकारी आणि संसदपटू म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली. त्यांचा पद्मभूषण सन्मानाने गौरव करण्यात आला होता. मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे दुआ यांची राजकीय समज उच्च दर्जाची होती. पत्रकारितेतील संपादकीय स्वातंत्र्य जपण्यासाठी त्यांनी कायमच कटिबद्धता दाखविली.
दुआ यांनी राज्यसभेत परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील चर्चेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक संसदीय समित्यांचे ते सदस्य होते. परराष्ट्र संबंधविषयक समिती आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचाही यात समावेश आहे.
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे ते दोन वेळा अध्यक्ष होते. लोकशाही मूल्यांचे ते खंदे पुरस्कर्ते होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावरही (एनएसएबी) त्यांनी काम केले. त्यांच्या माध्यम क्षेत्रातील कामाचा पंजाब आणि कुरुक्षेत्र विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टर पदवी देऊन गौरव केला.
पद्मभूषण सन्मानाखेरीज त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना दुर्गा रत्न पुरस्कार, बाळ गंगाधर टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर राजकीय; तसेच माध्यम क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
चार दशकांची कारकीर्द
दुआ यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’चे संपादक (१९८७-९४), ‘द इंडियन एक्स्प्रेस’ (१९९४-९६) आणि ‘द ट्रिब्यून’चे (२००३-०९) मुख्य संपादक आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’चे (१९९७-९८) संपादकीय सल्लागार म्हणून काम केले. डेन्मार्कमध्ये त्यांनी भारताचे राजदूत (२००१-०३) म्हणूनही काम केले होते. राज्यसभेमध्ये (२००९-२०१५) ते खासदार होते. ते ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे ते दोन वेळा अध्यक्ष होते.
