Illegal Bangladeshi Migrants : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक कडक पावलं उचलले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात देखील कडक कारवाई केली जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांच्या विरुद्ध दिल्ली पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात तब्बल ७०० बेकायदेशीर नागरिकांना परत पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्ली आणि देशातील विविध राज्यांमध्ये देखील बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीत एका महिन्यांत अनेक मोठ्या कारवाया करत दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात धडक मोहीम राबवली आहे. या कारवाई दरम्यान बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशातील ४७० लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच इतर देशातील ५० लोकांचीही ओळख पटवण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध दिल्ली पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना हिंडन विमानतळावरून त्रिपुरातील अगरतळापर्यंत पोहोचवत त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवलं आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत महत्वाचा निर्णय घेत कडक कारवाईचे आदेश दिले होते.
६ महिन्यांत ७०० बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवलं
बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे FRRO) सोपवण्यात आलं आहे. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना रेल्वे आणि रस्त्याच्या मार्गाने पूर्वेकडील राज्यांमध्ये नेऊन तेथून बांगलादेशला पाठवलं आहे. या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, गेल्या एका महिन्यात गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवरून सुमारे तीन ते चार विशेष विमानांद्वारे बेकायदेशीर स्थलांतरितांना आगरतळा येथे पाठवण्यात आलं आहे. गेल्या ६ महिन्यांत एकूण ७०० बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर्व १५ जिल्ह्यांच्या डीसीपींना पडताळणी मोहीम राबवून बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित आणि रोहिंग्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर, दिल्ली पोलिसांच्या पहिल्या बटालियनचे एक पथक आणि एफआरआरओ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन रेल्वेने पश्चिम बंगालला गेले. तेथून सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना बसने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्वाधीन करण्यात आले आणि शेवटी त्यांना बांगलादेशला पाठवण्यात आले.