जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २२ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सर्व पर्यटनस्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयबाने केलेल्या त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये बहुसंख्य पर्यटकांचा समावेश होता.
एकीकडे, पर्यटकांची पावले पुन्हा एकदा काश्मीरकडे वळत आहेत. गेल्या वर्षीच्या कटू स्मृती आणि भीती बाजूला ठेवून अनेक पर्यटक पहलगामला जात आहेत. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सर्व सुरक्षा संस्थांना काश्मीरमधील पर्यटन स्थळी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सज्जतेचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्यात आल्या असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपेरशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानात हल्ला चढवला आणि तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे आधीच ताणलेले संबंध अधिक बिघडले. दोन्ही देशांनी एकमेकांना हवाई हद्द बंद केली आहे, ती अद्याप सुरू झालेली नाही. तसेच व्यापारही बंद आहे.
